गडचिरोलीतील एटापल्ली येथे केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) १९१ बटालियनच्या  एका जवानाने आपल्या दोन सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्या. संजय शेंद्रे असे गोळीबार केलेल्या जवानाचे नाव असून त्याने विलास संघपाल आणि एस.एन. इंगळे नावाच्या जवानांवर गोळी झाडली. ही घटना मंगळवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास घडली. एकाला पोटात तर दुसऱ्याच्या डाव्या पायाला गोळी लागली. दोघांनाही अहेरीच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर चंद्रपूर आणि नंतर नागपूरला हलवण्यात आले. या तीन जवानांमध्ये यापूर्वीही वैयक्तिक कारणांवरून वाद झाला होता. तिघेही हवालदार पदावर कार्यरत आहेत. जखमी जवानांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित जवान घटनेनंतर पसार झाला होता.  पण  नंतर त्याला अटक करण्यात आले.

या घटनेत जवानाच्या हातून चुकून तीन राऊंड फायर झाल्याचे सीआरपीएफचे म्हणणे आहे. त्यामुळे याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जखमी जवानांच्या जबाबानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती एटापल्लीचे पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी दिली.