News Flash

..तर रेल्वे अर्थसंकल्पाला अर्थ काय?

रेल्वेने ५ ते १२ वयोगटातील मुलांचे अर्धे तिकीट बंद करून पूर्ण तिकीट केले.

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

मागील वर्षांतील उत्पन्न, खर्च आणि झालेले काम आणि पुढील वर्षी होणारे काम, योजनांची, नवीन गाडय़ांची घोषणा, अपेक्षित उत्पन्न आणि खर्च याचा लेखाजोखा रेल्वेच्या अर्थसंकल्पात असतो, त्यामुळे त्यातून रेल्वेची दिशा स्पष्ट होत असल्याचा आजवर अनुभव होता, परंतु अलीकडे दर दोन महिन्यात होणारे बदल करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. रेल्वेने १ जून २०१६ पासून रेल्वेच्या प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित दर्जाच्या तिकिटाचे भाडे वाढवले आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्प केवळ वार्षिक उत्सव ठरण्याची चिन्हे आहेत.

गेल्या दीड वर्षांत रेल्वेने तिकीट दर, तिकीट रद्द करण्याचे शुल्क, तात्काळ तिकिटाचे शुल्क, लहान मुलांच्या तिकिटासंदर्भात अनेक बदल केले आहे. रेल्वेने अर्थसंकल्पात प्रवासी भाडय़ात कुठलाही बदल न करून जनतेकडून पाठ थोपटून घेतली. परंतु काही महिन्यात विविध प्रकारच्या शुल्कातून छुपी दरवाढ केली. ही छुपी दरवाढ प्रवाशांशी केलेला धोका आहे तर पण रेल्वे अर्थसंकल्पातून या गोष्टी वगळून मागील दारातून करण्याची लबाडी केली आहे.

रेल्वेने ५ ते १२ वयोगटातील मुलांचे अर्धे तिकीट बंद करून पूर्ण तिकीट केले. लहान मुलांच्या प्रवासावरील ही वाढ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली. म्हणजे रेल्वे अर्थसंकल्पापूर्वीच प्रवासभाडे वाढवण्यात आले.

तात्काळ तिकीट शुल्क ३३ टक्के वाढवण्यात आले. संसदेचे हिवाळी अधिवेशन संपताच ते (डिसेंबर २०१५ ला) लागू करण्यात आले. त्यानंतर तात्काळ तिकीट बुकिंग करण्याच्या वेळात बदल करण्यात आला. वातानुकूलित तिकीट सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान आणि वातानुकूलितरहित तिकीट सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान असा बदल १५ जून २०१५ पासून लागू करण्यात आला.

रेल्वेचे तिकीट रद्द करण्याच्या नियमात १ फेब्रुवारी २०१६ पासून बदल करण्यात आला. तिकीट रद्द करण्याचे शुल्क दुप्पट करण्यात आले. २५ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. याशिवाय आखणी चांगला बदल करण्यात आला, पण तो देखील रेल्वे अर्थसंकल्पापासून दूर ठेवण्यात आला. रेल्वे तिकिटांवरील नाव बदल करण्याची मुभा देण्यात आली. त्यासाठी रेल्वेस्थानक व्यवस्थापक किंवा वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांच्या स्वाक्षरी आवश्यक आहे.

प्रवासाच्या २४ तास आधी असा बदल करता येणे शक्य आहे, पण ज्यांच्या नावे तिकीट करावयाचे आहे, ती व्यक्ती रक्तातील असावी असे बंधनकारक आहे. याशिवाय तिकिटाचे भाडे परत करण्याच्या नियमात बदल करण्यात आले. हा नियम २१ नोव्हेंबर २०१५ पासून लागू करण्यात आला.

झालेले बदल

  • ५ ते १२ वयोगटातील मुलांचे पूर्ण तिकीट
  • तात्काळ तिकीट शुल्कात ३३ टक्के वाढ
  • रेल्वे तिकिटावरील नाव बदल करण्याची मुभा
  • तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात वाढ

अर्थसंकल्पातील गाडीचे ‘ट्रायल’

तत्कालीन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी नागपूर- पुणे, नागपूर- अमृतसर एक्सप्रेसची घोषणा केली होती. या गाडय़ा सुरू करण्यात पुढील मार्चची मुदत पाळण्यात आली नाही. शिवाय रेल्वे अर्थसंकल्पात घोषित गाडीचा ‘ट्रायल रन’ दोन वर्षांपासून घेण्यात येत आहे. नागपूर-पुणे वातानूकुलित साप्ताहिक विशेष गाडी दर मंगळवारी नागपुरातून सुटते. नाागपूर- अमृतसर वातानुकूलित साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी नागपूर दर शनिवारी निघते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 3:22 am

Web Title: issue of railway budget
टॅग : Railway Budget
Next Stories
1 दशकपूर्तीनंतर ‘त्या’ घटनेच्या आठवणी ताज्या !
2 गुणवंत..जातिवंत..!
3 मेट्रो, प्रन्यासचे संकेतस्थळ ‘अद्ययावत’, महसूल मागासलेलेच!
Just Now!
X