एनआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधन
नागपूर : सेंद्रिय खताची निर्मिती लोप पावत जात आहे तर दुसरीकडे घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. यावर पर्याय म्हणून नागपूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी स्वयंपाकघरातून निघणाऱ्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली असून मिथेन गॅसचे तंत्रज्ञानही विकसित केले आहे.
प्रज्ज्वल खेरडे, रूपाली पिपरे, प्रज्योत गायकी, अरिवद जाधव आणि रोहन पूर्वीया या पाचही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून एक संशोधन करणे आवश्यक होते. त्यामुळे या पाचही विद्यार्थ्यांनी समाजउपयोगी अशा विषयावर संशोधन केले पहिजे, असा निर्णय घेतला. विविध संदर्भ, पुस्तके आणि इंटरनेटच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली. प्रज्ज्वल खेरडेला लोप पावत असलेल्या सेंद्रिय खताला चालना देण्याची युक्ती सुचली. त्याने यासंदर्भात अधिक महिती गोळा केली. सेंद्रिय खत निर्मितीसाठी तब्बल ६० दिवस लागत होते. हे खत अल्पावधीत तयार कराण्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांनी पावले उचलली. त्यासाठी एक विशेष उपकरण तयार करण्याचे ठरवले. एक रोटर ड्रम कम्पोर्स्टर अर्थात मोठा ३३० एमएम बाय ८३८ एमएमचा लोखंडी ड्रम तयार केला. तो फिरता राहावा यासाठी त्याला १० आरपीएमची मोटार लावण्यात आली. त्यामध्ये पारंपरिक शेणखत किंवा इतर वस्तू टाकण्याऐवजी या विद्यार्थ्यांनी खत निर्मितीसाठी वेगळी संकल्पना निवडली. दररोज स्वयंपाकघरातून निघणाऱ्या कचऱ्याचा उपयोग त्यासाठी केला. यामध्ये ७५ टक्के ओला तर २५ टक्के सुका कचरा होता. त्या ड्रमच्या आत फिरते लोखंडी चक्र लावण्यात आले जेणेकरून कचऱ्याचे योग्य मिश्रण तयार होईल. त्याशिवाय तापमान यंत्र बसवण्यात आले. या सर्व प्रक्रियेमध्ये जीवजंतू निर्मितीसाठी दह्यचा उपयोग केला. ड्रमच्या खाली ६० डिग्री तापमानासाठी एक कॉईल लावले. दिवसातून दोन चार वेळा एका तासासाठी तो कचरा फिरवण्यात आला. कॉईलमुळे आत कचऱ्यातून गरम गॅस म्हणजे मिथेन गॅस तयार होऊ लागला. याची चाचणी घेण्यात आली. ड्रमला एका बाजूने कचरा टाकण्यासाठी जागा तर खालच्या बाजूने खत काढण्यासाठी जागा ठेवण्यात आली. वरच्या बाजूला तयार होणारा गॅस जमा करण्यासाठी नोझल देण्यात आले. ही प्रक्रिया दहा दिवस नियमित सुरू ठेवल्याने सेंद्रिय खताबरोबरच मिथेन गॅसची निर्मिती झाली. हे खत नैसर्गिक शेतीसाठी उपयोगाचे ठरले तसेच त्यातील गॅस स्वयंपाकासाठी उपयोगी आणता येईल, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. जवळपास १० दिवसात १ किलो मिथेन गॅसची निर्मिती शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सध्या तयार होणाऱ्या गॅसची दुर्गंधी येत असून त्यामध्ये कडूलिंबाचा पाला टाकल्यास दुर्गंधी कमी होईल, असे प्रज्ज्वलने सांगितले. या संशोधनासाठी प्रा. रूपेश खोरगडे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता अमोल देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.