News Flash

खरे-खोटे गोसेवक ओळखा

‘लक्ष्यभेदा’साठी केंद्र व लष्कराचे कौतुक

सरसंघचालक मोहन भागवत (संग्रहित छायाचित्र)

सरसंघचालकांचा सल्ला; ‘लक्ष्यभेदासाठी केंद्र व लष्कराचे कौतुक

‘देशात पशुहिंसा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. कायद्यानुसार सरकारने गोरक्षा करणे आवश्यक आहे. मात्र, सरकारकडून या कायद्याची पूर्णार्थाने अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने गोसेवक पुढे येऊन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरतात. त्यास अतिरंजीतपणे मांडण्यात येऊ नये. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी समाजात दुफळी निर्माण होईल, असे काही करू नये. सर्व गोरक्षकांना एकाच धाग्यात गोवणे चुकीचे ठरेल. त्यामुळे प्रामाणिक गोसेवक आणि पाखंडी गोसेवक यांच्यातील फरक सरकारने ओळखावा आणि त्यानुसार दोषींवर कारवाई करावी’, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी दिला.

विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे येथील रेशीमबाग मैदानावर शस्त्रपूजन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना सरसंघचालकांनी विविध विषयांवर भाष्य केले. त्यांचे हे भाष्य नेहमीच्याच पठडीतले होते. यावेळी स्वयंसेवकांनी कवायती आणि पथसंचलन केले.

‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती चिंताजनक असून सीमेपलीकडील देशातून भारतात दहशतवाद पसरवून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उरी लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आणि लष्कराने स्वीकारलेली भूमिका व सैन्याचा पराक्रम अभिनंदनीय आहे’, अशा शब्दांत पाकव्याप्त काश्मीरमधील लक्ष्यभेदी कारवाईचा थेट उल्लेख न करता त्यांनी मोदी सरकारची पाठ थोपटली. ‘ही आक्रमकता यापुढेही कायम राहावी’, असेही ते म्हणाले. ‘भारताला अस्थिर ठेवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी काही शेजारी देश जाणीवर्पूक काश्मीरसह सीमावर्ती भागांमध्ये दहशतवाद पसरवण्याचा, घुसखोरी घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सरकार आणि लष्कराने गाफील राहून चालणार नाही’, असे भागवत यांनी बजावले.

संपूर्ण काश्मीर भारतातेच

‘जम्मू, लडाखसह काश्मीरच्या मोठय़ा भागात शांतता नांदते आहे. भारत-पाक दरम्यानच्या नियंत्रण रेषेवर दहशवादी कारवाया चालू आहेत. त्यावर आक्रमकपणे कारवाई करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे’, असे भागवत म्हणाले. ‘मीरपूर, मुजफ्फराबाद, गिलगिट, बाल्टीस्तान आदी भागांचा उल्लेख करून, संपूर्ण काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे’, असे त्यांनी पाकिस्तानला ठणकावले. ‘लोकशाही देशात विरोधकांना सरकारच्या धोरणांवर टीका करण्याची मुभा असते. परंतु देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च स्थान देऊन विरोधकांनी टीका करायला हवी. राजकीय स्वार्थासाठी देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड करू नये’, अशा शब्दांत भागवत यांनी लक्ष्यभेदी कारवाईबाबत संशय व्यक्त करणाऱ्यांचा समाचार घेतला.

‘काश्मीर खोऱ्यातील हिंदू पंडितांना नागरिकत्व बहाल करणे आणि त्यांना सुविधा देण्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आणखी किती दिवस त्यांनी प्रतीक्षा करायची?’, असा सवाल त्यांनी जम्मू-काश्मीर व केंद्र सरकारला केला. ‘शिक्षणाचे बाजारीकरण रोखून सर्वसामान्यांना मोफत किंवा कमी खर्चात शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी आणि शिक्षकांनी केवळ व्यवसाय म्हणून शिक्षकी पेशाकडे न बघता देशासाठी नवीन पिढी तयार करण्याचे आव्हान म्हणून बघावे, अशी शिक्षण व्यवस्था लागू करा’, असा हितोपदेश भागवत यांनी सरकारला यावेळी केला.

 

नव्या पोशाखात स्वयंसेवक, उपस्थिती मात्र घटली ; गडकरी, फडणवीस नव्या पेहरावात

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९० वर्षांच्या इतिहासात प्रथमच खाकी चड्डीऐवजी चॉकलेटी रंगाची पूर्ण विजार अशा पोशाखात स्वयंसेवक विजयादशमी समारंभात सहभागी झाले होते. संघाच्या बदललेल्या पोशाखाबाबत उत्सुकता असतानाच संचलनाच्या वेळी स्वयंसेवकांची घटलेली उपस्थिती हासुद्धा चर्चेचा विषय ठरला होता.

रा. स्व. संघाला मंगळवारी ९० वष्रे पूर्ण झाली आहेत. मधल्या काळात गणवेशात काही बदल करण्यात आले. पण खाकी अर्धी चड्डी मात्र बदलली नव्हती. शेवटी गेल्या वर्षी संघाच्या प्रतिनिधी सभेने खाकी अर्धी चड्डीऐवजी चॉकलेटी रंगाची फुलपॅण्ट अशा गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर यंदाच्या विजयादशमी उत्सवाबद्दल वेगळी उत्सुकता होती. नवीन गणवेशातही स्वयंसेवकांनी काठीच्या कवायती आणि पथसंचलन केले. यात एक-दोघे सोडले तर कुणालाही अधिक नवीन गणवेशाचा विशेष त्रास झाले नाही. मात्र, दरवर्षी विजयादशमी उत्सवाला मैदानावर अडीच ते तीन हजार स्वयंसेवक असतात.

यंदा जवळपास दीड हजारांच्या आसपास स्वयंसेवक असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही नव्या पोशाखात स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दरवर्षी विजयादशमीला संघाच्या खाकी अर्धी चड्डी या पारंपरिक वेशात उपस्थित राहात. यंदा पोशाख बदलल्याने या दोन्ही नेत्यांनी चॉकलेटी रंगाची विजार परिधान केली होती. या वेळी भारतीय आर्थिक सेवेतून निवृत्त झालेले सत्यप्रकाश राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पोशाखात वेळोवेळी झालेले बदल

रा. स्व. संघाची स्थापना १९२५मध्ये झाली तेव्हा खाकी शर्ट आणि त्याच रंगाची चड्डी असा पोशाख होता. १९४० मध्ये सफेद शर्ट आणि खाकी चड्डी असा बदल झाला. १९७३ मध्ये बूट तर २०१० मध्ये पट्टय़ांमध्ये बदल करण्यात आला. आता पूर्ण पेहरावच बदलला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:19 am

Web Title: mohan bhagwat reminds govt of resolution on kashmir says its time to translate into action
Next Stories
1 RSS Mohan Bhagwat: सध्याचे सरकार कार्यक्षम; मोदी सरकारवर सरसंघचालकांची स्तुतिसुमने
2 राष्ट्रवादी काँग्रेससाठी विदर्भ कठीणच
3 संघ स्वयंसेवकांच्या नव्या गणवेशाचा तुटवडा
Just Now!
X