चतुर्वेदींच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह; मुंबईतील बैठकीत आरोप

नागपूर : शहरात आमदार दुष्यंत चतुर्वेदी हे जुन्या शिवसैनिकांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याचा आरोप होत आहे. कार्यकारिणीतही त्याचे पडसाद उमटले. नागपुरातील नेत्यांनी मुंबई शिवालयात खासदार अनिल देसाई यांच्यासमक्ष झालेल्या बैठकीत याबाबतच्या आरोपांची जंत्रीच मांडली.

शिवसेनेची नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आल्यापासून शिवसैनिकांमध्ये संताप आहे. या संतापामुळे अनेक जण  दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. हा प्रकार वरिष्ठांपासून लपून राहिलेला नाही. माजी शिवसैनिक शेखर सावरबांधे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर  पक्षप्रमुखांना उपराजधानीत सर्व आलबेल नसल्याचे समजले. त्यांनी ताबडतोब  जुन्या व नवीन नेत्यांना मुंबईत बोलावून खासदार अनिल देसाई यांना बैठक घ्यायला लावली. संध्याकाळी ४  पासून ७ वाजेपर्यंत मंत्रालय परिसरातील शिवालयात ही बैठक झाली. या बैठकीला खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जयस्वाल, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, नगरसेवक किशोर कुमेरिया, माजी जिल्हाप्रमुख सतीश हरडे आदींसह जवळपास ७० आजी-माजी पदाधिकारी  उपस्थित होते. याशिवाय शिवसेना समन्वयक प्रकाश वाघ हेही उपस्थित होते. यावेळी विद्यमान कार्यकारिणी आणि सर्व नेत्यांनी देसाई यांच्यासमक्ष आपली बाजू मांडली. माजी पदाधिकाऱ्यांचा सर्व रोष आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर होता. ते एककल्ली पद्धतीने शहरात शिवसेना चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जुने शिवसैनिक आणि वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतात. कार्यकारिणीत दुसऱ्या पक्षातून आलेल्या व काहीही अनुभव नसलेल्या लोकांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. तसेच जुन्या पदाधिकाऱ्यांना न विचारता त्यांना कमी महत्त्वाचे पद दिल्याचे आरोपही यावेळी करण्यात आले. यामुळे शेकडो शिवसैनिकांनी यापूर्वीच शिवसेना सोडली असून ही परिस्थिती बदलली नाही, तर भविष्यात महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली. दुष्यंत चतुर्वेदी व मानमोडे यांनी मात्र जुन्या शिवसैनिकांना विश्वासात घेऊनच काम सुरू असल्याचे सांगितले. भविष्यात जुने पदाधिकारी व शिवसैनिक आणि कार्यकारिणीत समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देसाई यांना दिले.

इटकेलवारांवरून दोन आमदार समोरासमोर

नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त म्हणून संदीप इटकेलवार यांच्या नियुक्तीला आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विरोध असून ते स्वत:ला त्या ठिकाणी नेमण्यासाठी प्रयत्नरत असल्याची बाब आमदार आशीष जयस्वाल यांनी देसाई यांच्यासमोर मांडली, अशी माहिती आहे. याकरिता चतुर्वेदी यांनी आपल्याला भ्रमणध्वनी करून इटकेलवार यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना भेटण्याची विनंती केली होती. पण,  पक्षाच्या धोरणानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून ती योग्य असल्याचे आपण चतुर्वेदींना सांगितले होते, अशी बाब त्यांनी बैठकीत दिली. जयस्वालांनी सर्वासमोर ही बाब सांगितल्याने बैठकीत चतुर्वेदींचा चेहरा पडला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.