विद्वत परिषदेमध्ये निर्णय

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली असली तरी विद्वत परिषदेने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून परीक्षा ‘ऑनलाईन’ व ‘ऑफलाईन’ अशा दोन्ही पद्धतीने घ्यावी अशी मागणी केली आहे. परीक्षेचा अंतिम निर्णय हा विद्वत परिषदेत होत असल्याने विद्यापीठाच्या परीक्षा  ‘ऑनलाईन’ व ‘ऑफलाईन’ अशा दोन्ही पद्धतीने होणार आहेत.

विद्वत परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये महाविद्यालय सुरू करण्यासह परीक्षांवर निर्णय घेण्यात आले. विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे उदय सामंत यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी चर्चा करून विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होतील अशी घोषणा केली होती. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी परीक्षा ‘ऑनलाईन’ व ‘ऑफलाईन’ अशा दोन्ही पद्धतीने घेण्याची सांगितले होते. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात. तेथे इंटरनेट, स्मार्टफोन अशा सुविधा नसल्याने त्यांची अडचण होते. त्यामुळे सर्वाना परीक्षेची संधी मिळावी यासाठी ‘मिक्स मोड’साठी विद्यापीठाचा आग्रह आहे.

मंगळवारी विद्वत्त परिषदेच्या बैठकीत या मुद्यावर सखोल चर्चा झाली. ‘ऑनलाईन’ परीक्षा तर होतीलच, मात्र सोबतच विद्यार्थ्यांना ‘ऑफलाईन’चा पर्यायदेखील खुला ठेवावा असा बैठकीतील सूर होता. विद्यार्थ्यांचे एकूण हित लक्षात घेता ‘मिक्स मोड’नेच परीक्षेचे आयोजन करण्यावर विद्यापीठाचा भर असल्याची माहिती आहे.

महाविद्यालय १५ फेब्रुवारीला होणार सुरू

राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. यावर नागपूर विद्यापीठानेही विद्वत परिषदेमध्ये चर्चा करून १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी करोनाचे सर्व नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.