नागपूरकरांनी मेट्रोतून प्रवास करावा, असे महामेट्रोने वारंवार आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागपूरकरांना टाळेबंदीच्या काळात सर्वच प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने मेट्रो रेल्वेची आठवण होऊ लागली आहे.

केंद्र सरकारने मार्च महिन्यात टाळेबंदी लागू करताना सर्वच प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केल्या होत्या. त्यात मेट्रो रेल्वेचाही समावेश होता. आता याला दोन महिने झाले आहेत. मेट्रोचे दोन्ही मार्ग ठप्प आहेत. शहर बसही बंद आहेत. कॅबलाही परवानगी नाही. ऑटोमध्येही एकच प्रवासी बसू शकतो. त्यामुळे नागरिकांची अडचण झाली आहे.

शहरात सध्या मेट्रो वर्धा मार्गावर बर्डी ते खापरी आणि हिंगणा मार्गावर बर्डी ते लोकमान्य नगर या दोनच मार्गावर मेट्रो धावत होती. या दोन्ही मार्गावर अपेक्षेइतके प्रवासी मेट्रोला मिळत नाही. खापरीजवळील मिहानमधील विविध कंपन्यांचे कर्मचारी तसेच  हिंगणा मार्गावर औद्योगिक वसाहतीतील कामगार व कर्मचारी यांनी मेट्रोने  प्रवास करावा म्हणून महामेट्रोचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र सर्व स्थानकांची कामे पूर्ण न झाल्याने प्रवाशांनीही आवश्यक त्या सर्व सोयी असूनही मेट्रोकडे पाठ फिरवल्याचे चित्र टाळेबंदीपूर्वीपर्यंत कायम होते.

दरम्यान, करोनाच्या साथीमुळे गर्दीमुक्त प्रवासाची गरज सर्वानाच जाणवू लागल्याने वर्धा व हिंगणा मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मेट्रोची आठवण होऊ लागली आहे. मिहानमधील काही कंपन्या सुरू झाल्या आहेत. छोटी-मोठी दुकाने, बाजार सुरू झाला आहे. शहरातही आवागमन वाढले आहे. अशा परिस्थितीत खापरी ते बर्डी या दरम्यान सर्वसामान्यांना जाण्या-येण्यासाठी खासगी वाहनाऐवजी कोणतीच सार्वजनिक व्यवस्था नाही. अशावेळी मेट्रो सुरू असती तर लोकांना आधार झाला असता, असे वर्धा आणि हिंगणा मार्गावर प्रवास करणारे नागरिक म्हणू लागले आहेत.

वर्धा मार्गावर मेट्रो दर अध्र्या तासाने धावत असे. वातानुकूलित तीन डब्ब्यात सुमारे १८० ते २०० प्रवासी नेण्याची क्षमता आहे. येथे विशिष्ट अंतर ठेवून प्रवास करणे शक्य आहे. शिवाय शहरातील गर्दीपासून मेट्रोचा मार्ग दूर आहे. स्थानकही मोठी आहेत, त्यामुळे पहिली टाळेबंदी संपल्यावर नागपूरमध्ये मेट्रो सुरू केली असती तर मिहानमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सोय झाली असती, असे विवेक खोपडे या कर्मचाऱ्याने सांगितले. ते मिहानमधील खासगी कंपनीत काम करतात.

खापरी, चिंचभवन, जयप्रकाशनगरसह वर्धा मार्गालगत असलेल्या इतरही वस्त्यांमधील युवक, महिलांना विविध कामांसाठी बर्डी परिसरात दवाखाना किंवा तत्सम कामासाठी जावे लागते. आता विमानसेवाही सुरू झाली आहे. तेथून बर्डीपर्यंत जाण्यासाठी मेट्रो हा सुरक्षित पर्याय ठरू शकतो, असे बँकेचे निवृत्त कर्मचारी अनिल देशमुख यांनी सांगितले. हिंगणा मार्गावरही हीच परिस्थिती आहे. या मार्गावर धावणाऱ्या सिटीबसमध्ये पाय ठेवायला जागा नसते. सध्या त्या बंद आहेत.

मात्र त्या भागातील दवाखाने, उद्योग ,कारखाने सुरू आहेत. तेथे काम करणारे बहुतांश कर्मचारी नागपुरातूनच जातात. त्यांच्यासाठी मेट्रोचा प्रवास हा सुरक्षित ठरणारा आहे. त्यामुळे १ जूननंतर केंद्र सरकारने परवानगी दिल्यास मेट्रो सुरू करावी, अशी मागणी आहे.

मेट्रो सज्ज आहे

सरकारने परवानगी दिल्यास नागपूर मेट्रो धावण्यास सज्ज आहे. करोनाच्या संदर्भात सरकारकडून जारी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून प्रवासी सेवा सुरू केली जाईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

मेट्रोचा प्रवास असा असेल

– प्रत्येक प्रवाशाला व  स्थानक कर्मचाऱ्याला मास्क बंधनकारक

– प्रवाशांच्या प्राथमिक तपासणीनंतरच मेट्रोत प्रवेश

– सर्व स्थानके व मेट्रोचे डब्यांचे निर्जंतुकीकरण करणार

– स्थानकावर शारीरिक अंतर राखून उभे राहण्यासाठी व्यवस्था

– उद्वाहकाचे बटण, सरकत्या जिन्यांचे दांडे यासह प्रवाशांच्या उपयोगात येणाऱ्या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था

– करोना जनजागृतीबाबत सर्व स्थानकावर फलक लावणार