मेट्रोच्या मार्गावर बससेवा नको; महापालिकेला पत्र

नागपूर : कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेली झगमगाटी स्थानके, वातानुकूलित सेवा आणि किफायतशीर तिकीट दर यासह अनेक सेवासुविधा देऊनही  मेट्रोला प्रवाशी मिळत नसल्याने महामेट्रोने आता शहरबसचे प्रवाशी मेट्रोकडे वळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. हिंगणा आणि बुटीबोरी या दोन मार्गावरील शहर बस सेवा थांबवावी, असे पत्र त्यांनी महापालिकेला पाठवले आहे. विशेष म्हणजे, वरील दोन्ही मार्गावर शहर बसला सर्वाधिक प्रवाशी संख्या मिळत असल्याने ते फायदेशीर आहे.

दरम्यान, एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी दुसऱ्या व जुन्या व्यवस्थेचा बळी देण्याचा हा प्रकार असल्याने महामेट्रोच्या प्रस्तावाला सध्यातरी महापालिकेने अनुकूलता दर्शवली नाही. पण आजवरचा मेट्रोचा इतिहास पाहता त्यांना हवे तसे ते करून घेत असल्याने व  याही वेळी असे झाले तर मेट्रोसाठी शहर बससेवेचा बळी जाण्याची शक्यता आहे. शहर बससेवा पूर्वी एस.टी.महामंडळाकडे होती. कालांतराने ती महापालिकेने ताब्यात घेतली. काही वर्षे चालवल्यानंतर केंद्र सरकारच्या योजनेतून मिळालेल्या बसेस खासगी तत्त्वावर चालवण्यास देण्यात आल्या. सध्या महापालिकेच्या परिवहन समितीच्या माध्यमातून या सेवेचे संचालन केले जाते. तीस लाखांच्या शहरातील सर्वच भागात सध्या शहरबसची सेवा सुरू आहे. विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि इतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी तरी ही एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. बसेसची अवस्था वाईट असली तरी प्रवाशांची मोठी गर्दी त्यात होते. शहर बसला पर्याय  म्हणून नागपुरात मेट्रो प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. सध्या दोन मार्गावर (हिंगणा आणि खापरी) ती धावत आहे. पण त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे महामेट्रोने शहर बसचे प्रवासी मेट्रोकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. तसे पत्र महामेट्रोने महापालिकेला दिले आहे. दरम्यान, महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी परिवहन समितीशी चर्चा करावी, अशी सूचना केली आहे. परिवहन समितीनेही या प्रस्तावाला विरोध केला आहे.

महामेट्रोचा प्रस्ताव

सध्या मेट्रो वर्धा मार्गावर खापरीपर्यंत आणि हिंगणा मार्गावर लोकमान्य नगपर्यंत धावत आहे. दुसरीकडे शहरबस  बर्डी ते बुटीबोरी व बर्डी ते हिंगणा या मार्गावर सुरू आहे. मेट्रोच्या प्रस्तावानुसार बर्डी ते बुटीबोरी ही  सेवा खंडित करून त्याऐवजी खापरी ते बुटीबोरी या दरम्यान तसेच हिंगणा मार्गावर बर्डी ते हिंगण्याऐवजी लोकमान्य नगर ते हिंगणा या पट्टय़ात शहर बससेवा सुरू करावी. म्हणजे बुटीबोरीला जाणारे प्रवाशी मेट्रोने खापरीपर्यंत तर हिंगण्याला जाणारे प्रवाशी मेट्रोने लोकमान्य नगपर्यंत जातील व पुढचा प्रवास अनुक्रमे बुटीबोरी व हिंगण्यापर्यंतचा प्रवास शहर बसने करतील. त्याचप्रमाणे या दोन्ही मार्गावरील शहर बसचे पासधारक (सुमारे १० हजार) मेट्रोकडे स्थानांतरित करायचे. त्यामुळे मेट्रोला पुरेशा प्रमाणात प्रवाशी मिळतील व दोन्ही मार्गावरील बसेसचा वापर इतर मार्गावर महापालिकेला करता येईल.

लोकांना सेवा देणे हा मेट्रो आणि शहर बस यांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था परस्परांना पूरक ठरावी असेच आमचे प्रयत्न आहेत. ज्या मार्गावर मेट्रो धावते, त्या मार्गावर शहर बस धावण्याऐवजी त्याच बसेस जेथे मेट्रो धावत नाही अशा ठिकाणी वापरल्या तर त्यामुळे लोकांचाच फायदा होईल. याच अनुषंगाने हा प्रस्ताव दिला आहे. आम्ही शहर बसच्या विरोधात नाही.

– अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक,(कापरेरेट कम्युनिकेशन)

नागपूरच्या सर्वच भागात सध्या शहर बस धावत असून ती लोकांच्या सोयीची आहे. त्यामुळे वरील दोन्ही मार्गावरील बस सेवा बंद करण्याचा प्रश्नच येत नाही.

– नरेंद्र बोरकर, सभापती, परिवहन समिती, महापालिका.