८०० एकरातील प्रकल्पात कृत्रिम रेतन केंद्र उभारणार – गडकरी

राज्य शासनाच्या सहाय्याने पतंजली समूह वर्धा जिल्ह्य़ातील हेटी गावाजवळ ८०० एकर जागेत १० हजार गायींचा सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे. येथे कृत्रिम रेतनाची व्यवस्था राहणार असून चांगल्या प्रतीच्या बैलांची निर्मिती केली जाईल. या प्रस्तावित प्रकल्पामुळे विदर्भातील दूध उत्पादन वाढले आणि कृषी क्षेत्राचा कायापालट होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

‘अ‍ॅग्रोव्हिजन-२००७’ या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित दुग्ध विकास परिषदेचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार आशीष देशमुख, माजी खासदार दत्ता मेघे, एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. दिलीप रथ, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उपम, डेअरी आयुक्त राजीव जाधव, अ‍ॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, संयोजक डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते.

गुजरात, राजस्थानमधील साहीवाल व गीर या उत्तम वाणाच्या गायीपासून तयार झालेले बैल हे कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून २ लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गायीला २० लिटर दूध क्षमता असलेली संतती निर्माण करू शकतात. यासाठी पशुसंवर्धन विभागाने कृत्रिम रेतनाची व्यवस्था व पशुवैद्यकीय तज्ज्ञांची ग्रामीण भागातच नेमणूक व्हावी याकरिता आवश्यक पावले टाकावी, अशी सूचना त्यांनी केली. प्रास्ताविक रवि बोरकर यांनी केले. रमेश मानकर यांनी आभार मानले.

एनडीडीबीला ८ एकर जमीन देणार

नागपूर महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने दुग्ध उत्पादनाच्या विक्रीकरिता ६५ ठिकाणी मदर डेअरीला जागा उपलब्ध करून दिली आहे. नागपुरातील मदर डेअरीतून सध्या १ लाख लिटर दूध संकलन होत आहे. ही क्षमता १० लाख लिटपर्यंत नेण्यासाठी सिव्हिल लाईन्समध्ये उपलब्ध असणारी ८ एकर अतिरिक्त जागा महाराष्ट्र शासनातर्फे एनडीडीबीला देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही गडकरी म्हणाले. विदर्भातील ९८३ गावांमधून १६, ५५३ दुग्ध-उत्पादकांद्वारे ६८४ दुग्ध संकलन केंद्रात १ लाख ३५ हजार दूध संकलन होत आहे. येथील ११ जिल्ह्य़ात ३,०३० गावांमधील १ लाख जणांना उपजीविकेचे साधन यामुळे मिळाले असून ५ हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. ४.४३ कोटी रुपये शेतकऱांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत जमा झाले आहे, असा दावाही त्यांनी केला.

अधिकाऱ्यांना पुन्हा दम

गरजेच्या वेळी गावात पशुवैद्यक राहत नाही, कृत्रिम रेतन केंद्राची अवस्था ग्रामीण भागात वाईट आहे. याचा फटका धापेवाडा येथील ‘डेअरी फार्म’ला बसला व ते  बंद करावे लागले. यात सुधारणा करण्यासाठी पशुवैद्यकांना गावात राहिले पाहिजे. जे राहत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा, असा सज्जड दम गडकरी यांनी दिला. कृषी विभागाचे अधिकारी त्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत काहीच काम करत नाहीत. त्यांच्याविरुद्ध शेतकऱ्यांनी आवाज उठवायला हवा. हे मी सरकार म्हणून सांगतो. त्याशिवाय यांच्याकडून होणार नाही, असे गडकरी म्हणाले.

एक महिन्यात दहा नवे जलमार्ग

एक महिन्यात देशभरात दहा नवे जलमार्ग सुरू करण्यात येईल, त्यात मुंबई-गोवा मार्गाचा समावेश आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ व जलसंपदा खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी फिनलॅण्डच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना सांगितले. शिष्टमंडळाने आज गडकरी यांची नागपुरात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावे्ळी फिनलॅण्डच्या फोर्टम इंडिया लि. व नागपूर महापालिका यांच्यात करारही करण्यात आला. फिनलॅंडची कंपनी शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन जार्जिग सेंटर व त्यासाठी तांत्रिक सहाय्य करणार आहे.