इंदिरा गांधी रुग्णालयात ना पंखा, ना पाणी

नागपूर : जिल्ह्य़ात एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात शारीरिक अंतर नियमाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे येथून करोनाचा संसर्ग वाढल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, या केंद्रात लसीसाठी येणाऱ्या वृद्धांना भर उन्हात ना पंखा, ना पाणी असलेल्या अवस्थेत तासन्तास लसीकरणासाठी ताटकळत राहावे लागत आहेत.

एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून लसीकरणावर भर देण्यावर जोर दिला जातो. परंतु दुसरीकडे केंद्र सरकारकडून योग्य प्रमाणात लसींचा साठा राज्याला उपलब्ध होत नसल्याने नागपुरातील बऱ्याच केंद्रांवर लसीअभावी लसीकरण बंद करण्याची पाळी येते. दरम्यान, महापालिकेकडून त्यांच्या सर्व केंद्रांवर अद्ययावत सोयी केल्याचा दावा केला जातो. परंतु गांधीनगरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात बुधवारी शारीरिक नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. येथे लसीकरणासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चा उपस्थितांच्या तुलनेत अपुऱ्या होत्या, अनेक वृद्धांना तासन्तास उकाडय़ात उभे रहावे लागले. येथे महापालिकेकडून नागरिकांना उन्हापासून वाचण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहे. परंतु येथे पंख्यासह पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे उकाडय़ाने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्यातच येथे लस घेण्यासाठी नकळत कुणी करोनाग्रस्त व्यक्ती  उभा झाल्यास त्याच्याकडून येथे शारीरिक अंतराचे नियम पाळल्या जात नसल्याने अनेकांना संक्रमणाचा धोका व्यक्त होत आहे. त्यामुळे बऱ्याच संतप्त नागरिकांनी येथील अधिकारी इमारतीच्या आत वातानुकूलित यंत्र वा कुलरमध्ये बसले असतांनाच नागरिकांना उकाडय़ाचा मन:स्ताप का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या विषयावर महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.