उमेश अग्रवाल यांचे प्रतिपादन
राज्यातील सुमारे १२५ भारतीय वनसेवेच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आणि महाराष्ट्र वनखात्याचा शाश्वत विकास कसा करता येईल, याचा विचार केला पाहिजे. सोबतच उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल करताना वनविभागाच्या ध्येयधोरणांची योग्य अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) उमेश अग्रवाल यांनी केले.
महाराष्ट्र वनविभागाच्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या २५ व २६ सप्टेंबरला आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप बुधवारी चिटणवीस सेंटर येथे झाला, यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेदरम्यान बुधवारी सकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालय प्रकल्प क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. गोरेवाडा परिसरातील जैवविविधता तसेच प्राणिसंग्रहालय परिसरातील विविध प्रजातींची माहिती सर्व अधिकाऱ्यांनी घेतली. वनभवनातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कमांड आणि कंट्रोल कक्षाला भेट दिली. यावेळी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती, तंत्रज्ञान व धोरण) प्रवीण श्रीवास्तव यांनी कमांड आणि कंट्रोल कक्षाबद्दल सखोल माहिती दिली. हा कक्ष होणाऱ्या बदलावर मात करून वनविभागाच्या विकासात महत्त्वाचा ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले. वनसंवर्धन कायद्यावर चर्चा करून क्षेत्रीय स्तरावर कशी अंमलबजावणी करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान हा वनसंवर्धनाचा महत्त्वाचा घटक असून विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. तसेच न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सुरू असलेली विभागीय चौकशीची प्रकरणे निकाली काढण्याबाबत चर्चा झाली. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी यांनी सामाजिक वनीकरण विभागाविषयी सादरीकरण केले.