28 November 2020

News Flash

हजारो विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ

अनेकांच्या उत्तरपत्रिका जमाच झाल्या नाहीत

अनेकांच्या उत्तरपत्रिका जमाच झाल्या नाहीत; विद्यापीठाने महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या याद्या पाठवल्या

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून अंतिम वर्षांच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत झाल्याचा दावा फोल ठरला आहे. विद्यापीठाच्या तांत्रिक गोंधळामुळे परीक्षा देऊनही हजारो परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिका ‘सव्‍‌र्हर’वर जमा न झाल्याने त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची वेळ येणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सर्व परीक्षा आटोपल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचना पत्र पाठवत त्यांच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांची परीक्षेची माहिती विद्यापीठाकडे पोहचली नसल्याचे सांगितले. यामध्ये कला आणि विज्ञान शाखेतील हजारो विद्यार्थी आहेत. प्राप्त माहितीनुसार, कला शाखेच्या ४ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाकडे जमा झालेल्या नाहीत. यामध्ये समाजशास्त्र विषयाचे १,१०० परीक्षार्थी, इंग्रजीचे १,५०० हजार, इतिहास विषयाचे ९०० तर अन्य विषयांच्या २०० परीक्षार्थीचा समावेश आहे. याप्रमाणे बीएस्सीच्या २५० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाला मिळालेल्या नाहीत.

याआधी अभियांत्रिकीच्या २,९२५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाला मिळालेल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या परीक्षेचे दुसऱ्यांदा आयोजन केले आहे. याप्रमाणे आता कला आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचीही दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची वेळ येणार आहे. विद्यापीठाच्या गोंधळाची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागणार असल्याने सर्वाचा प्रचंड मन: स्ताप होत आहे.

या प्रकरणावर परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले की, तांत्रिक कारणामुळे किंवा इंटरनेटची जोडणी व्यवस्थित नसल्याने अनेक परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिका जमा होऊ शकलेल्या नाहीत. मात्र, अशा कुठल्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसून अनुपस्थित विद्यार्थ्यांसह या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.

असा झाला गोंधळ

विद्यापीठाच्या ‘आरटीएमएनयू परीक्षा अ‍ॅप’वर विद्यार्थ्यांना बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा द्यायची होती. प्रश्न सोडवून झाल्यावर विद्यार्थ्यांना पेपर ऑनलाईन जमा(सबमिट) करायचा होता. मात्र, सुरुवातीपासूनच उत्तरपत्रिका जमा होत नसल्याच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. उत्तरपत्रिका जमा केल्यावरही त्यांना तो जमा झाल्याचा संदेश येत नव्हता. पेपर जमा केल्यावर अनेकदा वेळ संपला किंवा ‘एरर’ असा संदेश मिळत होता. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच जमा होऊ शकलेल्या नाही.

कुलगुरूंची चुप्पी

या सर्व गोंधळामुळे आज सोमवारी सकाळी बी. एस्सी.च्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. यानुसार महाविद्यालयांनी ही परीक्षा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी चुप्पी साधली आहे. या प्रकरणावर त्यांना फोन व संदेश पाठवला असता त्यांनी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे विद्यापीठाचा दावा फोल ठरला हे सिद्ध होते.

प्रशासनाचा दावा फोल

परीक्षा देताना वेळ संपल्यावर विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका आपोआप जमा होईल, असा दावा विद्यापीठाने केला होता. याशिवाय केवळ लॉगिन केलेल्या विद्यार्थ्यांच्या भरवश्यावर रोज ९५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा दावाही केला जात होता. मात्र, तांत्रिक गोंधळामुळे विद्यापीठ प्रशासन उघडय़ावर पडले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:40 am

Web Title: re exam for students who failed to submit answer sheets on server due to technical issue zws 70
Next Stories
1 विदर्भातील आमदारांमुळेच तुम्हाला मंत्रिपदे मिळाली!
2 समित ठक्करच्या घरावर शिवसैनिकांकडून दगडफेक!
3 पेंच व्याघ्र प्रकल्प कर्मचाऱ्यांवर मासेमारांचा जीवघेणा हल्ला
Just Now!
X