मुख्यमंत्र्यांनी केलेली ११ कोटींची घोषणा

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ सप्टेंबर २०१७ रोजी विभागीय क्रीडा संकुलाच्या विकास कामांसाठी अकरा कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. अद्याप हा निधी मिळाला नाही, या निधीतून संकुलातील अनेक महत्त्वाची कामे करण्यात येणार होती हे येथे उल्लेखनीय.

क्रीडा संकुल परिसरातील सिंथेटिक ट्रॅकच्या शेजारी मोठे पॅव्हेलियन बांधकामाला सुरुवात झाली. खेळाडूंना अत्याधुनिक सोयसुविधा, मिळावी यासाठी त्याचे बांधकाम गेल्या वर्षी सुरू झाले. मात्र, सध्या ते बंद असून निधीअभावी रखडले आहे. १६ सप्टेंबर २०१७ मध्ये पश्चिम क्षेत्रीय कनिष्ठ गट आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा नागपुरात झाल्या होत्या. यावेळी उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांनी त्यावेळी विकास कामांसाठी ११ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी विभागीय आयुक्तांनी तसा प्रस्ताव माझ्याकडे पाठवावा, मी तो तातडीने मंजूर करतो असेही ते म्हणाले होते. मात्र, या घोषणेला आज दहा महिने झाले असून अध्याप निधी मिळालेला नाही.

विभागीय आयुक्त आणि क्रीडा संकुल समितीने प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे संबंधित विभागाला पाठवला. त्यांनी तो क्रीडा विभागाकडे पाठवला. क्रीडा विभागाने त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दुरुस्ती करून अपेक्षेप्रमाणे सुधारित प्रस्ताव पाठवला. त्यानंतर तो प्रस्ताव क्रीडा व युवक सेना संचालनालय यांच्या मार्फत पाठवा, असे सांगण्यात आले. तसा प्रस्तावही पाठवण्यात आला. मात्र, त्यानंतर तो क्रीडा विभागाकडून मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्यात आला. गेल्या दहा महिन्यांपासून तो धूळखात पडला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीशिवाय तो निधी मिळू शकत नसल्याने पॅव्हेलियनचे बांधकाम रखडलेले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या शहरातच निधी मिळत नसल्याने खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी आहे. पॅव्हेलियन पूर्ण झाले नसल्याने सिंथेटिक ट्रॅकवर होणाऱ्या  स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना शौचालय आणि कपडे बदल्यासाठी मोठी कसरत करावी लागते.