03 June 2020

News Flash

भांडेवाडीतील कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेताना मुंढे यांना कचरा ट्रान्सफर स्टेशन प्रस्तावाची माहिती मिळाली.

स्मार्ट सिटी प्रकल्पातून ४० कोटींची तरतूद

नागपूर : भांडेवाडी आणि जवळपासच्या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या समस्येतून दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्त  तुकाराम मुंढे यांनी  एक मोठे पाऊल उचलले आहे. भांडेवाडी डंम्पिग यार्डमध्ये वर्षांनुवर्षे जमा झालेला कचरा वैज्ञानिक पद्धतीने बायोमायनिंग करून ती जमीन मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंढे यांनी गेल्या आठवडय़ात भांडेवाडी डंम्पिग यार्डला भेट दिली होती. तेथील  कचऱ्याचे मोठे ढिगारे पाहून ते संतापले होते. उन्हाळ्यात कचऱ्यामध्ये आग लागण्याचे प्रकार होतात आणि वायू प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. एक लाखाहून अधिक नागरिकांना अस्थमाने ग्रासले आहे.

या विरोधात परिसरातील नागरिकांनी हरितलवादाकडे दाद मागितली आहे. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेताना मुंढे यांना कचरा ट्रान्सफर स्टेशन प्रस्तावाची माहिती मिळाली. यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून  पाच ट्रान्सफर स्टेशन प्रस्तावित करण्यात आले होते. घराघरातून एकत्रित होणारा कचरा छोटय़ा गाडय़ांच्या माध्यमातून ट्रान्सफर स्टेशनला आणणे आणि त्या कचऱ्याला मोठय़ा कंटेनरच्या माध्यमातून भांडेवाडीपर्यंत नेणे अशी प्रक्रिया प्रस्तावित होती. यासाठी निविदा प्रक्रिया प्रारंभ झाली होती. स्मार्ट सिटी प्रकल्पातूनच ४० कोटींची तरतूद करण्यात आली होती. तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी संभाळल्यानंतर  प्रस्तावित ट्रान्सफर स्टेशनची निविदा प्रक्रिया रद्द करून त्याचे ४० कोटी रुपये बायोमायनिंग प्रकल्पात वापरण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांना ही या संदर्भात माहिती दिली होती. भांडेवाडीमध्ये ६ ते ८ लाख मेट्रिक टन जुना कचरा जमा आहे.  कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे प्रक्रिया करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया झाल्यास ३२ एकर जागा महापालिकेला उपलब्ध होऊ  शकते. या जागेचा उपयोग भांडेवाडी डंम्पिग यार्डमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी उपयोग होऊ  शकतो.

आयुक्तांनी दिला चार ‘आर’चा मंत्र

स्वच्छता दुतातर्फे जमा करण्यात येणारा कचरा हा भांडेवाडीपर्यंत विलग स्वरूपातच यावा, यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी घरातूनच ओला व सुका कचरा विलग स्वरूपात द्यावा, असे आवाहन करतानाच आयुक्तांनी नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी चार ‘आर’चा मंत्र दिला आहे. त्यात ‘रिडय़ूस (घरात निर्माण होणारा कचरा कमी करणे) ‘रियूज’ (कचऱ्याचा पुनर्वापर), रिसायकल (पुनप्र्रक्रिया) आणि रिफ्यूज  (प्लास्टिकचा उपयोग टाळा) आदींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 1:56 am

Web Title: scientific method process on waste in bhandewadi dumping yard tukaram munde
Next Stories
1 Maharashtra HSC Board Exam 2020 : कक्षात उशिरा सोडल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ
2 सत्ता गेल्यानंतर भाजपला शहाणपण!
3 काँग्रेसच्या वर्चस्ववादी धोरणावर राष्ट्रवादी नाराज
Just Now!
X