शरद पवारांचा भाजपला टोला

नागपूर : राज्यघटनेतील अनुच्छेद ३७१ मुळे ईशान्येकडील राज्यांत जमीन-घर खरेदी करता येत नाही. हे अनुच्छेद रद्द करा, त्यास आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारला लगावला.

बुटीबोरी येथे  गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणा विधानसभेचे उमेदवार विजय घोडमारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, संसदेने अनुच्छेद ३७० रद्द केले. त्यावर भाजपचे नेते आम्हाला विचारतात, तुमचे मत काय आहे? संसदेत अनुच्छेद रद्द करताना केवळ चार-पाच सदस्यांचा विरोध होता. कारण या संदर्भातील निर्णय घेताना काश्मीरच्या लोकांना विश्वासात घ्या, एवढीच त्यांची मागणी होती; परंतु राज्यकर्ते लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काय केले हे न सांगता ३७० करून विरोधकांवर टीका करीत आहेत. ३७० रद्द झाल्याने काश्मीरमध्ये घर, जमीन खरेदी करता येते. याचे आम्ही स्वागत करतो. पण ३७१ अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. हा अनुच्छेद रद्द करत  असाल तर त्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण हे सरकार ३७१ संदर्भात काहीही करायला तयार नाही. त्याचे कारण एकच आहे. ३७०च्या नावाने, पुलवामाच्या नावाने त्यांनी लोकांची दिशाभूल चालवली आहे.

कोणी तरी तक्रार केली म्हणून माझे नाव राज्य सहकारी बँक गैरव्यवहारात गोवण्यात आले. मी बँकेचा संचालक नाही. तरीही  माझ्यासारख्यालाली गुंतवण्यात आले, असे पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे नागपूर गुन्हेगारीत प्रथम!

वर्धा : मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे नागपूरसह विदर्भात गुन्हेगारांचे साम्राज्य वाढत आहे. अशी नाचक्की कधीच झाली नव्हती. मुख्यमंत्र्यांचे शहर असलेले नागपूर आज गुन्हेगारीत देशात प्रथम क्रमांकावर आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. हिंगणघाटचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजू तिमांडे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. छत्रपतींनी आदर्श कारभाराने उत्तम राज्यव्यवस्था दिली होती; परंतु आज त्याचे पदोपदी उल्लंघन होत आहे. स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. नागपूर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात आहे, असे टीकास्त्र पवार यांनी सोडले.