देवेश गोंडाणे

विविध शासकीय विभागांमधील मेगाभरतीसाठी पाच वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेल्या ‘महापरीक्षा संकेतस्थळा’वरून महाघोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या भरतीसाठी झालेल्या परीक्षांमध्ये अनियमितता आढळून आल्या. पात्र उमेदवारांना डावलून अपात्र उमेदवारांची निवड करण्यात आली, असा एमपीएससी समन्वय समितीसारख्या विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे.

शिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीसारख्या सक्षम संस्था असताना राज्य सरकारमधील भरती परीक्षा खासगी संस्थांकडे सोपवण्याच्या प्रवृत्तीवरही या निमित्ताने प्रकाश पडतो. प्रस्तुत महाघोटाळा नेमका कसा घडला, अपात्र उमेदवारांच्या नियुक्त्या कशा झाल्या या प्रश्नांच्या मुळाशी गेल्यावर धक्कादायक तपशील हाती आले.

‘महाऑनलाइन’ संकेतस्थळ अचानक बंद करून तत्कालीन युती सरकारने २०१६ मध्ये ‘महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ’ म्हणजेच ‘महाआयटी’ची स्थापना केली. ‘महाआयटी’ने निविदा प्रक्रियेद्वारे २०१७ मध्ये माहिती तंत्रज्ञान उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमेरिकी ‘यूएसटी ग्लोबल’ या खासगी कंपनीची निवड केली. मेगाभरतीची अर्ज प्रक्रिया, प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा केंद्र निवडणे, वेळापत्रक ठरवणे आणि ऑनलाइन परीक्षेची जबाबदारी ‘यूएसटी ग्लोबल’वर होती.

परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापनासाठी ‘यूएसटी ग्लोबल’ने ‘अर्सेअस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला सहकंपनी म्हणून काम दिले. ‘यूएसटी ग्लोबल’ने ‘महापरीक्षा संकेतस्थळा’वरून २०१८ ते २०१९ या दोन वर्षांत एकूण १८ हजार ८५४ पेक्षा अधिक पदांची भरती प्रक्रिया राबवली. त्यासाठी जवळपास १३ लाखांहून अधिक अर्ज होते. परंतु ‘महापरीक्षा’ संकेतस्थळावरून नोकरभरती सुरू होताच अनेक अपात्र उमेदवारांची नियुक्ती झाल्याचे दिसून आले.

काही उदाहरणे लक्षणीय ठरतात. महापरीक्षा संकेतस्थळामार्फत अहमदनगर जिल्ह्य़ातील गट-क तलाठी संवर्गातील २३६ रिक्त पदांसाठी जुलै २०१९ला घेतलेल्या परीक्षेमधून गैरप्रकार, सामूहिक कॉपी आणि तोतया उमेदवारांनी परीक्षा दिल्याचे आरोप झाले. यासाठी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणारे अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मे २०२० मध्ये दिलेल्या बारा पानी अहवालामधून अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. या अहवालानुसार, अहमदनगर तलाठी भरती प्रक्रियेत गुणवत्तेच्या क्रमानुसार उमेदवारांची यादी २३ डिसेंबर २०१९ला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. यातील उमेदवारांना जानेवारी २०२० मध्ये मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावण्यात आले. या परीक्षेत सामूहिक कॉपी आणि गैरप्रकाराच्या अनेक तक्रारी दूरध्वनी व ई-मेलवर जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. कागदपत्रे पडताळणीदरम्यान द्विवेदी यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी ‘महाआयटी’च्या संचालकांना या २३६ उमेदवारांच्या परीक्षा केंद्रावरील ‘सीसीटीव्ही चित्रणा’ची मागणी केली. मात्र, एवढय़ा उमेदवारांचे ‘चित्रण’ देणे शक्य नसल्याचे कारण ‘महाआयटी’कडून देण्यात आले. त्यामुळे द्विवेदी यांनी संशयित १४ उमेदवारांच्या ‘चित्रणा’साठी पुन्हा विनंती अर्ज केला. मात्र, त्याबाबतही ‘यूएसटी ग्लोबल’च्या मुंबई येथील प्रकल्प अधिकाऱ्याने सहकार्य केले नाही. पण यातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे सोडून मागील सरकारने द्विवेदी यांचा अहवालच नाकारला.

आणखी एक उदाहरण. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील २६६ कनिष्ठ लिपिक पदांसाठी २०१९ला परीक्षा घेण्यात आली होती. या २६६ पदांच्या गुणवत्ता यादीमधील प्रथम क्रमांकाच्या तीन उमेदवारांना २०० पैकी १९४ गुण मिळाले. म्हणजे, केवळ सहाच चुका झाल्या. गंमत म्हणजे, या उमेदवारांनी चुकीची सोडवलेली सहाही उत्तरे एकसारखी आहेत! (उदा. पहिल्या उमेदवाराचा २५ क्रमांकाचा प्रश्न चुकला असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या उमेदवारानेही तोच प्रश्न चुकीचा सोडवला आहे.) यावरही कडी म्हणजे, या तिन्ही उमेदवारांनी आपल्या सहा चुकीच्या उत्तरांमध्ये निवडलेला पर्यायही सारखाच आहे. ‘लोकसत्ता’कडे या उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या प्रती आहेत. या तीनही उमेदवारांनी एकाच दिवशी, एकाच वेळी गोंदिया जिल्ह्य़ातील तिरोडा येथील केंद्रावरून परीक्षा दिली होती. २०० प्रश्न १२० मिनिटांत सोडवायचे असतात आणि प्रश्नपत्रिकाही अवघड असल्यामुळे १९४ गुण मिळवणे हेच जवळपास दुरापास्त असते, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.

परीक्षा प्रक्रियेमध्ये असे अनेक संशयास्पद प्रकार घडून आलेले आढळतात. हे सारे कशासाठी घडून येत होते, यात कोणाचे साटेलोटे आहे या प्रश्नांची उत्तरे खरे तर विद्यमान सरकारने शोधण्याची गरज होती. त्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने ‘महापरीक्षा संकेतस्थळ’ बंद करून या प्रकरणाचा पाठपुरावाच केला नाही.

अहमदनगर तलाठी भरतीविषयी आक्षेप

– काही उमेदवारांचे अर्ज आणि परीक्षा प्रवेशपत्रावर त्यांच्या नातेवाईकांच्या सह्य़ा आहेत.

– एकाच तोतया उमेदवाराने दोन अन्य उमेदवारांच्या परीक्षा दिल्याचे सिद्ध झाले आहे.

– कुठल्या परीक्षा केंद्रावर व कोणत्या पदासाठी परीक्षा दिली याची माहिती उमेदवारांनाच नव्हती.

– उमेदवाराच्या स्वाक्षरीसह छायाचित्रात तफावत.

– परीक्षा प्रवेशपत्रावर पर्यवेक्षकाची स्वाक्षरीच नव्हती.-

संचालक मंडळाची भूमिका

‘महाआयटी’च्या संचालक मंडळावर सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांची बिगरप्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. कंत्राट प्रक्रियेमध्ये संचालक मंडळाची भूमिका महत्त्वाची असते. त्यातही बिगरप्रशासकीय अधिकाऱ्याचा त्याच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे ‘महाआयटी’वर वरदहस्त होता. ‘यूएसटी ग्लोबल’ची नियुक्ती आणि ‘महापरीक्षा’ संकेतस्थळावर झालेला महाघोटाळा पाहता, मुळात या कंपनीची नियुक्ती करणाऱ्या संचालक मंडळाविषयी प्रश्न उपस्थित होतात.

तीन सख्ख्या भावंडांची निवड

तलाठी पदाच्या २०१९ मध्ये झालेल्या भरतीमध्ये उपराजधानीतील तीन बहीण-भावांची निवड झाली आहे. यातील दोघांना परीक्षेत मिळालेले गुण एकसारखे आहेत. त्यामुळे एकाच घरातील उमेदवारांची झालेली निवड, सारखे गुण हे सगळे संशयास्पद आहे. खरे तर हे उमेदवार नागपूरचे. नागपूर सोडून एखाद्या आडगावात जाऊन त्यांनी परीक्षा देण्याचे काय कारण? तरीही त्यांनी भंडारा जिल्ह्य़ाच्या एका छोटय़ा तालुक्याच्या केंद्रावरून परीक्षा दिली होती!

‘यूएसटी ग्लोबल’चे म्हणणे

‘यूएसटी ग्लोबल’ ही अमेरिकी कंपनी असली तरी कंपनीमध्ये भारतीय मोठय़ा प्रमाणावर आहेत. ज्या राज्यांमध्ये या कंपनीला आजवर कंत्राटे मिळाली, ती आहेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान. कंपनीला कंत्राटे मिळाली त्यावेळी या राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती हा योगायोग विलक्षण. मात्र, ‘यूएसटी ग्लोबल’च्या जनसंपर्क विभागाला पाठवलेल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावले. महाराष्ट्र सरकारच्या भरती प्रक्रियेची नोडल एजन्सी असलेल्या ‘महाआयटी’च्या सूचना आणि करारानुसार परीक्षा घेण्यात आल्या. ‘महाआयटी’ आणि ‘यूएसटी’ने मिळून प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवारांची पडताळणी आणि देखरेखीसाठी एक सक्षम यंत्रणा तयार केली. यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात आली होती. ‘आम्ही ‘महाआयटी’सोबतच्या करारानुसार परीक्षा घेतल्या आणि निकालही यशस्वीरीत्या दिल्या, असे त्यांनी सांगितले.