शाळेसमोरची झाडे तोडली

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपुरातील मिहान भागात वृक्षारोपण करीत असताना, विद्यार्थी त्यांच्यासमोर पथनाटय़ाच्या माध्यमातून वृक्षलागवडीचे महत्त्व सांगत असतानाच गुरुवारी सायंकाळी मात्र ‘न्यू हॉरिजन पब्लिक स्कूल’च्या व्यवस्थापनाने त्यांच्या शाळेच्या इमारतीसमोर येणारी पूर्ण वाढ झालेली झाडे अवैधरित्या तोडल्याचा प्रकार समोर आला.

हनुमाननगर परिसरात ‘न्यू हॉरिजन पब्लिक स्कूल’ शाळा नुकतीच सुरू झाली. कमलाकर उटखेडे या शाळेचे संचालक असून शाळेच्या सुरक्षा भिंतीवर येणाऱ्या जाहिराती रस्त्यावरील झाडांमुळे दिसत नसल्यामुळे ती कापण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रस्त्यावरील झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी लागते. याठिकाणी मात्र उटखेडे यांनी विनापरवानगी पूर्ण वाढ झालेली दोन झाडे तोडली. तिसरे झाड तोडण्याच्या प्रयत्न होत असताना शीतल चौधरी यांना हा प्रकार आढळून आला. त्यांनी लगेच वृक्षतोड करणाऱ्यांना थांबवले आणि शाळा मालकाला बोलावले. सुरुवातीला त्यांनी परवानगी घेऊन वृक्षतोड करीत असल्याचे सांगितले, पण परवानापत्र मागितल्यानंतर त्यांनी वृक्षतोडीसाठी परवानगीच घेतली नसल्याचे लक्षात आले. यावेळी शीतल यांनी अवैध वृक्षतोडी विरोधात लढा देणाऱ्या ग्रीन विजिल पर्यावरण संस्थेला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली आणि ग्रीन विजिलच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाचे श्री. माटे यांना सांगितले. घटनास्थळी माणसे पाठवतो, असे आश्वासन माटे यांनी दिले, पण तब्बल तासभर वाट बघूनही उद्यान विभागाचे कुणीही आले नाही. तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमल्याचे पाहून उटखेडे यांनी माघार घेत असा प्रकार पुन्हा होणार नाही, असे आश्वासन दिले. दरम्यान, याठिकाणी पूर्ण वाढ झालेल्या कॅशिया या प्रजातीची तब्बल तीन झाडांची तोड करण्यात आली होती. मात्र, वृक्षलागवड सप्ताहात उपराजधानीत घडलेल्या वृक्षतोडीच्या या प्रकारावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नरमाईच्या भूमिकेवर आश्चर्य

हा संपूर्ण प्रकार माझ्य़ा डोळ्यादेखत झाला, पण शाळेचे संचालक हे मानायलाच तयार नव्हते. ग्रीनविजिल, महापालिकेच्या उद्यान विभागाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्यानंतर कमलाकर उटखेडे यांनी चूक मान्य केली. मात्र, उद्यान विभागाने या प्रकरणात घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेवर आश्चर्य वाटत आहे, असे शीतल चौधरी म्हणाल्या. या वृक्षतोडीसाठी मी मजूर बोलावले नाही. कुणी झाडे कापली हे देखील मला माहीत नाही. वृक्षतोड करून मला काय मिळणार आहे, असा उलट प्रश्न कमलाकर उटखेडे यांनी केला.