महेश बोकडे

राज्यातील खासगी महाविद्यालय वा विद्यापीठातील सात प्रयोगशाळांत आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्र अशा सर्व सुविधा उपलब्ध असतानाही  ‘राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यायान मंडळा’च्या (एनएबीएल) मंजुरी अभावी येथे करोना चाचणी सुरू झाली नाही. दुसरीकडे राज्यातील आठ शासकीय प्रयोगशाळांत आवश्यक यंत्र पोहचले नसल्याने येथेही चाचणी सुरू झालेली नाही.

राज्यातील अनेक शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसह इतर संस्थांनी करोना चाचणीसाठी विषाणूजन्य प्रयोगशाळेकरिता भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद (आयसीएमआर)कडे अर्ज सादर करून तातडीने पायाभूत सुविधा उभारणे सुरू केले. मुंबई वगळून राज्यातील ३२ प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी संबंधितांना मदत करण्यासोबतच त्यांना मंजुरीचे अधिकार आयसीएमआरने नागपूर एम्सला दिले आहेत. एम्सकडून प्रा. डॉ. मनीष श्रीगिरीवार सगळ्या प्रयोगशाळांशी समन्वय साधत आहेत. यातील सात खासगी प्रयोगशाळांचे काम पूर्ण झाले असून त्यांना एनएबीएलकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, जळगाव, अंबेजोगाई, नांदेड, बारामती, कोल्हापूर या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत आवश्यक मनुष्यबळ असून पायाभूत सुविधा उभारण्याचे काम शेवटच्या टप्यात आहे. परंतु चाचणीसाठी लागणारे आरटी पीसीआर, लॅमिनल फ्लो, बायोसेफली लेवल टू कॅबिनेट, उने ८० आणि उने २० अंश सेल्सिअसचे कोल्ड सेंट्रीफ्यूज डीप फ्रीजरसह इतर  यंत्र येथे पोहचले नाहीत. या यंत्राची खरेदी झाली असून लवकरच ते पोहचणार आहेत. त्यामुळे आता ७ खासगी प्रयोगशाळांच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.  शनिवारी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीचा मार्ग मोकळा झाला.

यांना मंजुरी हवी..

* जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, वर्धा

* क्रिष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायंसेस, कराड</p>

* डी. वाय. पाटील, पुणे

* रुरल मेडिकल कॉलेज, लोणी

* एमजीएम मेडिकल कॉलेज, औरंगाबाद</p>

* डी. वाय. पाटील, कोल्हापूर

* भारती विद्यापीठ, पुणे

लवकरच मंजुरीची आशा असून एम्सनेही एनएबीएलला तातडीने प्रक्रिया करण्याची विनंती केली आहे.  काही प्रयोगशाळांतील अधिकाऱ्यांना एम्सने प्रशिक्षण दिले असून मंजुरीनंतर  त्यांची एक परीक्षा होईल. ती उत्तीर्ण होताच येथे करोना चाचणी सुरू होईल.

– मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, संचालिका, एम्स, नागपूर.