कुलगुरू डॉ. मोहम्मद असलम परवेज यांचे खडेबोल

नागपूर : कुराण केवळ मुस्लिमांचा धार्मिक ग्रंथ नसून संपूर्ण मानवजातीला एका धाग्यात बांधणारा दुवा आहे. त्यामुळे कुराणचा दाखला देऊन सर्वाना मुस्लीम करण्याची जबाबदारी तुमची नाही. कुराण कुणालाही तशी परवानगी देत नाही, असे खडेबोल मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी हैद्राबादचे कुलगुरू डॉ. मोहम्मद असलम परवेज यांनी सुनावले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी दीक्षांत सभागृहात मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ‘समाजाप्रति आपली कर्तव्य’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, अब्दुल माजीद पारेख, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे उपस्थित होते.

समाजात मुस्लिमांना कुणीही घरे भाडय़ाने देत नाहीत. कॉलनीतही त्यांचा शेजार नकोसा असतो. त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. याबाबतची कारणे मुस्लीम समाजाने शोधली पाहिजे, असेही कुलगुरू डॉ. मोहम्मद असलम परवेज म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, समाजात बंधुभाव नांदावा, हेच इस्लाम सांगतो. कुराणवर बोलणाऱ्यांची काही कमी नाही. परंतु, ते समजावून सांगणाऱ्यांचीच सध्या वानवा आहे. कुराणनुसार जीवन जगण्यास मुसलमान बांधील असल्याचेही ते म्हणाले. इस्लामसाठी मारण्या-मरणाच्या गोष्टी होत असताना कुराणचा योग्य अर्थ काढून त्यानुसार जीवन जगणे आज काळाची गरज झाली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली, तर अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ. काणे यांनी सर्व धर्मग्रंथ एकच गोष्टी सांगतात. मात्र, समाज त्यानुसार जगत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अब्दुल माजीद पारेख यांनी, संचालन डॉ. वीणा दाढे यांनी तर आभार डॉ. हिवसे यांनी मानले.