चंद्रपूर जिल्ह्य़ातील सावली तालुक्यात कोरडा दुष्काळ पडला असून धानाचे पीक घेता न आल्याने तेथील लोकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विवंचनेतून शेकडो लोकं कामाच्या शोधात तेलंगणात स्थलांतरित झाले आहेत. रोजगाराच्या शोधात स्थलांतरणामुळे मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे.

तालुक्यातील पेंढरी, सायमारा, मुंडाळा, पांढरसराड, चारगाव, भारपायली गावात सिंचनाची सोय नाही. पावसाच्या पाण्यावर धान शेती केली जाते. या भागात हेच प्रमुख पीक आहे. त्यावरच शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेततळी कोरडी पडली आहेत. जुलै महिन्यात झालेल्या सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी धान पेरणी केली. त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने ‘परे’ सुकली. प्रमुख पीक गेल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर इतरत्र कामाच्या शोधात भटकंती करू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात पेंढरी येथील नागरिक तेलंगण राज्यातील भद्रचलम येथे स्थलांतरित झाले आहेत. तेथे ते मिरची तोडणीचे काम करावयास गेले आहेत. यासंदर्भात पेंढरी येथील राजू गंडाटे म्हणाले, यावर्षी धानाचे पीक आले नाही. गावातील लोक नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड, भिवापूर येथे तर काहीजण यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी येथे तसेच गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा आणि इतर ठिकाणी शेतकामासाठी स्थलांतरित झाले. आता पेंढरीतील काही लोक भद्रचलम येथे गेले आहेत. पती, पत्नी दोघे कामासाठी परराज्यात गेल्याने मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे. काहींनी आपल्या नातेवाईकांकडे मुलांना ठेवले आहे, असे राजू गंडाटे म्हणाले.

गोसेखुर्दचेही पाणी नाही

सावली तालुक्यात आसोलामेंढा इंग्रजकालीन तलाव असून त्याद्वारे सिंचन केले जाते. परंतु या तालुक्यातील पेंढरी, सायमारा, मुंडाळा, पांढरसराड, चारगाव, भारपायली गावांना या तलावाचे पाणी मिळत नाही. आता गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात सोडण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी या तलावाची क्षमतावाढ करण्यात येत आहे, परंतु केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या या गावातील लोकांना पाणी मिळेल याची शाश्वती नाही. त्यांच्यासाठी उपसा सिंचन योजना किंवा इतर पर्यायाचा विचार होणे आवश्यक आहे.

‘‘या भागातील पेंढरी आणि मुंडळा गावातील शेतकऱ्यांना शंभर टक्के पाणी मिळणे अशक्य आहे. तेथील शेती उंचावर आहे. नव्याने होत असलेल्या उपकालव्यामुळे या दोन्ही गावातील काही शेतांना पाणी मिळू शकेल. या भागातील दुष्काळी स्थितीबाबत हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी विम्याची १०० टक्के रक्कम देण्याचे तसेच १४ हजार प्रति एकर मदत करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.’’

विजय वडेट्टीवार, आमदार, काँग्रेस