बदलत्या हवामानाचा आणि त्या बदलामुळे होणाऱ्या धोक्याचा संकेत देणारी यंत्रणाच बंद असेल तर त्याचे परिणाम काय होतात, याचा अनुभव नागपूरसह विदर्भालाही येत आहे. त्यामुळेच हवामानाच्या व्यक्त होणाऱ्या अंदाजावर कितपत विश्वास ठेवावा, यावर नागरिक आणि विशेषत: शेतकरी येऊन पोहोचले आहेत. विदर्भात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून पारा ज्या पद्धतीने पुढे सरकला आहे, त्यावरून हाही अंदाज खोटा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या आठवडय़ात विदर्भातील बहुतांश भागात गारपिटीसह पाऊस कोसळला. त्यानंतर या आठवडय़ात अजूनपर्यंत तरी अवकाळी पावसाची लक्षणे नाहीत. मात्र, विदर्भात पाऊस पडण्यास पोषक हवामान तयार होत असल्याचा आणि शुक्रवारपासून मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने या आठवडय़ाच्या सुरुवातीला व्यक्त केला. शनिवारी विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही त्यांनी दिला. हा अंदाज व्यक्त करत असतानाच गुरुवापर्यंत राज्यात हवामान ढगाळ मात्र, कोरडे राहण्याचा अंदाजही व्यक्त केला. हवामान खात्याच्या या अंदाजापैकी आठवडा लोटला तरीही अजून एकही अंदाज खरा ठरलेला नाही. गुरुवापर्यंत हवामान ढगाळ, पण कोरडे राहील, हा अंदाज साफ फसला आहे. याउलट, गेल्या तीन दिवसांपासून पारा झपाटय़ाने वर गेला आहे. आठवडाभरापूर्वी पडलेला पाऊस आणि आता पडलेले उन्हं यांच्या सरमिसळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचीही विशेषत: फळबागाधारक शेतकऱ्यांची परिस्थितीही अतिशय वाईट झाली आहे. पावसाळ्यातील गारपिटीचा जेवढा फटका शेतकऱ्यांना बसत नाही, त्याहून कितीतरी पटीने अधिक फटका फेब्रुवारी-एप्रिलदरम्यान होणाऱ्या गारपिटीचा बसतो. त्यामुळे याच काळात हवामानाचा अचूक अंदाज वर्तवला जाणे हवामान खात्याकडून अपेक्षित आहे. सुमारे महिनाभरापूर्वी हवामान खात्याने गारपिटीचा अंदाज वर्तवला होता, पण कुठेही गारपीट झाली नव्हती. त्यामुळे  या अंदाजाविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

‘रडार’ वारंवार बंद

बदलत्या हवामानाचे आणि त्या बदलामुळे होणाऱ्या धोक्याचे संकेत देणाऱ्या ‘डॉप्लर रडार’बाबत नागपूर सुदैवी ठरले आहे. राज्याची राजधानी आणि उपराजधानी अशा दोनच ठिकाणी ही यंत्रणा आहे. असे असताना नागपूरला मात्र ही यंत्रणा टिकवून ठेवता आली नाही. या यंत्रणेमुळे ढग, वारा, गारा, वादळ यांची स्थिती आणि त्यांचा आलेख सॅटेलाईटवर येत असतो आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात तशी धोक्याची देता येऊ शकते. वारंवार बंद पडणाऱ्या रडारमुळे या सर्व गोष्टींपासून विदर्भ मुकला आहे. त्यातही बहुतांशी फसणाऱ्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे धोक्यांपासून बचावात्मक पावित्रा घेण्याआधीच त्या धोक्याच्या वादळात शेतकऱ्यांसह नागरिकसुद्धा भरडले जात आहे. एकीकडे डिजिटल इंडियाच्या स्वप्नात सरकार हरपले असताना हवामान खात्याच्या यंत्रणेची ही अवस्था खरोखरीच डिजिटल इंडियासाठी पोषक आहे का, यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इशारा उशिराच

फेब्रुवारीअखेर आणि मार्चच्या सुरुवातीला विदर्भासह राज्यात झालेल्या गारपिटीचासुद्धा इशारा हवामान खात्याने उशिरा दिला. शुक्रवार, २६ फेब्रुवारीला गारपीट सुरू झाली, शनिवार, २७ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यात गारपीट सुरू झाली, सोमवार, २९ फेब्रुवारीला अजून काही ठिकाणी गारपीट झाली आणि हवामान खात्याने मात्र मंगळवार, १ मार्चला गारपिटीचा इशारा दिला.