तब्बल १५ वर्षांनंतर राज्यात एक वर्षांपूर्वी सत्ताबदल झाला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार जाऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले. नवे सरकार म्हटले की, नव्या योजना, त्यासंबंधीच्या नव्या घोषणांचा सुकाळ असतो. सत्ता मिळवणाऱ्या राज्यकर्त्यांना नवे काहीतरी करण्याची ऊर्मी असल्याने सामान्य जनताही या योजना व घोषणांकडे मोठय़ा अपेक्षेने बघत असते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेले हिवाळी अधिवेशन युती सरकारचे पहिलेच अधिवेशन होते. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी घोषणांचा पाऊस पाडला. गेल्या वर्षभरात या घोषणांची अंमलबजावणी नेमकी किती झाली?, या प्रश्नावर आताच्या अधिवेशनात कुणीही साधी चर्चा करताना सुद्धा दिसत नाही. जुन्या घोषणा विसरा व नवीन लक्षात ठेवा, याच तत्त्वाचे पालन सर्व स्तरावर होताना दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या वेळी सरकारने केलेल्या घोषणा व अंमलबजावणीच्या पातळीवर या घोषणांची सध्याची अवस्था, याचा घेतलेला हा आढावा.
वरील प्रमुख घोषणांशिवाय इतर अनेक घोषणा गेल्या वेळच्या अधिवेशनात करण्यात आल्या. त्या पूर्ण व्हाव्यात याकडे कुणीही लक्ष दिले नाही. नागपूर शहरात शंभर एकरावर कृषी निर्यात केंद्र सुरू करण्याची घोषणा सध्यातरी हवेत विरली आहे. नागपूर सुधार प्रन्यासला क्षेत्रविकास प्राधिकरणाचा दर्जा देण्याचे आश्वासन सुद्धा सत्ताधारी या वर्षभरात विसरून गेले. नासुप्रला वाढीव वित्तीय अधिकार देण्याच्या घोषणेची सुद्धा तीच गत झाली. विदर्भात सात निर्यात केंद्र सुरू करू, असे गेल्या वेळी मोठय़ा तावात सांगण्यात आले. प्रत्यक्षात एकही केंद्र सुरू झालेले नाही. अमरावतीचा टेक्सटाईल्स पार्क सुरू झाला. मात्र, त्यातील सात हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट मात्र अजून साध्य झालेले नाही. अमरावती विमानतळावर रात्रीचे लँडिंग, अकोला विमानतळाला जागा, या घोषणांचे काय झाले ते कळायला मार्ग नाही. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची घोषणा वर्षभरात पूर्ण होऊ शकली नाही. राज्यातील १२८ तालुक्यात अग्निसुरक्षा राबवण्याच्या घोषणेची सुद्धा तीच गत झाली आहे. गेल्या वेळच्या घोषणा पूर्णत्वाकडे गेल्या नाहीत, याची जाणीव असून सुद्धा युती सरकार यंदा नव्या घोषणा करण्यात पुन्हा व्यस्त असल्याचे चित्र अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात बघायला मिळाले आहे.

घोषणा सद्यस्थिती
आयआयटी व एम्स सुरू करणार प्रस्ताव अद्याप मंत्रालय स्तरावर
गोरेवाडा रेस्क्यू सेंटर आता १६ डिसेंबरला उद्घाटन
बुद्धिष्ट सर्किटचा आराखडा काहीही हालचाल नाही
काटोल संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू करणार अंमलबजावणी नाही
नागपूर टर्मिनल मार्केट प्रस्ताव कागदावरच
राज्यमार्गावरील खड्डे बुजवणार खड्डे कायम
गोरेवाडा प्राणी संग्रहालय काम पूर्ण नाही
तलाठय़ांची ३०८४ पदे भरणार अंमल नाही
ओबीसी क्रिमीलेयर मर्यादा वाढवणार आश्वासन अपूर्ण
सिंचनाचा कालबद्ध कार्यक्रम कुठेच दिसला नाही