अकोला : राज्यात यंदा १० कोटी वृक्षारोपणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. पुढील वर्षापासून हे उद्दिष्ट २५ कोटी राहील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.

अकोला व वाशीम जिल्ह्यातील विविध विकास कामे व योजनांचा अंमलबजावणीचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी नियोजन भवनात घेतला. यावेळी मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा.अनुप धोत्रे, आ.रणधीर सावरकर, आ.अमोल मिटकरी, आ.वसंत खंडेलवाल, आ.किरण सरनाईक, आ.संजय खोडके, आ.साजिद पठाण, आ.सई डहाके, अप्पर जिल्‍हाधिकारी प्रमोद गायकवाड, महापा‍लिका आयुक्त सुनील लहाने, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आदी उपस्थ‍ित होते.

बैठकीत जिल्ह्याचे आर्थिक नियोजन, २०२३-२४ या काळातील कामे व त्यावरील खर्चासंबंधित माहिती घेतली. खरीप हंगामासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय व्यवस्था व नियोजन याबद्दल सविस्तर माहिती घेतली.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, नियोजन समितीच्या निधीचा अपेक्ष‍ित कामांवर खर्च होत नाही व अनावश्यक खरेदीच्या तक्रारी येतात. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. निधी संपूर्णपणे खर्च होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुदतीत नियोजनपूर्वक कामे व्हावीत. नाविन्यपूर्ण योजनेत चांगली व भरीव कामे होतील, याची दक्षता बाळगावी.

खरिप हंगामात कृषी निविष्ठांच्या विक्रीत लिंकिंग अजिबात खपवून घेणार नाही. थेट गुन्हे दाखल करावे. दोषी कंपनीवरही गुन्हे दाखल करावे. शेतीत व कृषी संशोधनात ‘एआय’चा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने तशी प्रात्यक्ष‍िके राबवावी. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वाढवावी. खरीप पिक कर्ज वितरणाचा आढावाही त्यांनी घेतला.

अकोला शहरातील भूमिगत सांडपाणी योजनेचे काम गुणवत्तापूर्वक पूर्ण करावे. शहराची २५ वर्षाची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन ठेवून कामे राबवा. शहरातील विकास कामांसाठी महापा‍लिकेला अतिरिक्त निधीची आवश्यकता पाहता तसा प्रस्ताव द्यावा. प्रधानमंत्री आवास योजनेला पीएम सूर्यघर मोफत व‍ीज योजना जोडली आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शासनाने १०० दिवस कृती कार्यक्रमानंतर आता १५० दिवस कार्यक्रम हाती घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत उद्द‍िष्टपूर्ती व्हावी. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना व्यापक प्रमाणावर राबवावी. वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी रूग्णालयाशी संबंधित प्रश्न सोडविण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानतळासाठी प्रयत्न करू शिवणी विमानतळावर ‘नाईट लँडिंग’, धावपट्टी विस्तारीकरण या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करू. धावपट्टीच्या रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही उपमख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.