अकोला : गेल्या दोन आठवड्यातील पूर परिस्थितीमुळे अजगर शेतामध्ये पाण्यासोबत वाहून आले आहेत. जिल्ह्यातील शिवापूर शेतशिवाराजत १० फूट लांब महाकाय अजगर प्रथमच आढळून आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी अजगर आढळल्याची माहिती ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठत अत्यंत शिताफिने अजगाराला पकडले. जंगलात सोडून देत अजगाराला जीवदान देण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे जंगलातून अजगर शेतामध्ये पाण्यासोबत वाहत आले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अजगर आढळून येण्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान. शिवापूर येथील शेतशिवारात बुधवारी एक मोठा अजगर शेतकरी व शेतमजुरांना दिसून आला. त्यांनी तत्काळ सर्पमित्र तथा मानद वन्यजीवरक्षक बाळ काळणे यांना माहिती दिली. बाळ काळणे व सर्पमित्र संतोष वाकोडे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. गवताचा रंग व अजगराच्या रंगात साम्य असल्यामुळे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान होते. बाळ काळणे यांनी नीट पाहणी करून अनुभव कौशल्याने अजगराला सुरक्षितपणे पकडले.
त्यांना संतोष वाकोडे यांची मोलाची साथ मिळाली. अजगराला पोत्यात टाकण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिक भयमुक्त झाले. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड आणि गजानन इंगळे यांच्याशी चर्चा करून अजगराला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे. बाळ काळणे यांनी आतापर्यंत ६५ च्यावर अजगरांना पकडून त्यांना सुरक्षित सोडत जीवदान दिले आहे.
‘अजगर शेतकऱ्यांचा शत्रू नव्हे तर मित्र’
ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांनी परिसरातील नागरिकांना अजगराची सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली. अजगर हे महाराष्ट्रातील बहुतांश भागात दिसून येतात. जनजागृतीमुळे वन्यजीव वाचावेत, ही भावना बहुतांश नागरिकांमध्ये रुजली आहे. माकड, हरिण, रान डुक्कर आदी अजगराचे भक्ष्य असून यांची संख्या तो कमी करतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी तो मित्र ठरतो. अजगर हा स्वतः मानवावर हल्ला करीत नाही. अजगारामध्ये प्रचंड ताकद, दातांची संख्या व विळखा मारण्याची विशिष्ट पद्धत अजगाराजवळ असल्याने त्याची छेडखानी करू नये. दुरून लक्ष ठेवत वनविभाग किंवा सर्पमित्रांना माहिती द्यावी. त्यामुळे अजगराला निश्चित जीवदान व सुरक्षा मिळेल. वन्यजीव वाचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सर्व नागरिकांच्या सहभागाने वन्यजीव संरक्षण सेवा ही योग्य होते, असे देखील ते म्हणाले.