भंडारा : भंडारा शहरात आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी १०६ वर्षांच्या यमुनाबाई सीताराम कुंभारे या आजीबाईंनी देखील उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे, मतदान केंद्रांवर जाऊन त्यांनी मतदान केले. तरुणांनाही लाजवेल अशा त्यांच्या इच्छाशक्तीचे सगळेजण कौतुक करत होते.
यमुनाबाई कुंभारे या संत लहरी वार्डमध्ये राहतात. वार्धक्याने थकल्या असल्या तरी त्यांचा मतदानाचा उत्साह मात्र कायम होता. प्रत्येक निवडणुकीत त्या आवर्जून मतदानाचा हक्क बजावत. यावेळी उमाठे कॉलेज येथे त्यांचे मतदान होते. मतदान केंद्र त्यांच्या घरापासून २ किमी लांब होते. तरीसुध्दा उन्हाची पर्वा न करता त्या मुलासोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेल्या.
हेही वाचा…उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी रांगेत…
यमुनाबाई कुटुंबातील प्रमुख असल्याचे त्यांचा मुलगा किशोर कुंभारे यांनी सांगितले. मतदानवाढीसाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न करण्यात आले. शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी त्याला प्रतिसाद देत सकाळच्या सुमारासच मतदान केंद्र गाठले. अनेक ज्येष्ठांना स्वतःच्या पायाने दहा पावले चालणेदेखील शक्य होत नव्हते. मात्र तरीदेखील राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्याचा उत्साह त्यांच्यात दिसून येत होता. त्यांना पाहून तरुणांना देखील प्रेरणा मिळत होती.