धावत्या गाडीत चढणे, उतरणे, दारात उभे राहून प्रवास या कारणांमुळे नागपूर रेल्वेस्थानक परिसरात वर्षभरात तब्बल पावणेदोनशे प्रवाशांचा बळी जातो. विदर्भातील इतर रेल्वेस्थानकाच्या परिसरात झालेल्या घटनांचा विचार केल्यास वर्षभरातील ही संख्या १२०० असल्याचे नागपूर लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून दिसून येते.

रेल्वे प्रवास करताना प्रवाशांचा निष्काळजीपणा, घाई आणि रेल्वेमार्ग ओलांडताना केलेला हलगर्जीपणा हे अपघाती मृत्यूला कारणीभूत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारित राज्यातील १६ लोहमार्ग ठाणी आहेत. दक्षिणेकडे बल्लारशहा, मुंबई मार्गावर इगतपुरी आणि नांदेड रेल्वेस्थानकापर्यंतची हद्द आहे. या भागात वर्षभरात झालेल्या रेल्वे अपघातांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे.

रेल्वे रुळ, रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना, धावत्या गाडीत चढताना किंवा उतरताना तसेच प्रवासादरम्यान दारात उभे राहून सेल्फी किंवा इतर स्टंटबाजी केल्याने,  गाडीच्या छतावरून प्रवास करताना किंवा गर्दीमुळे हे अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वे प्रवासादरम्यान विविध कारणांनी मृत्यू झालेले १३०० प्रवाशी आहेत. यात आत्महत्यांच्या प्रकरणांचा देखील समावेश आहे. त्यांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात येते.  याशिवाय प्रवास न करणारे, परंतु रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्यांचेही अपघाती मृत्यू होतात.

रेल्वे फाटक  बंद असताना दुचाकी किंवा सायकल काढण्याच्या प्रयत्नातही काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना नेहमी घडतात. मानवरहित रेल्वे फाटक ओलांडताना देखील मृत्यू होतात.

दरवर्षी सरासरी १२०० ते १३०० जणांचा अपघाती मृत्यू होत असल्याचे रेल्वे लोहमार्ग पोलिसांची आकडेवारी सांगते.

गेल्या वर्षभरात नागपूर रेल्वेस्थानकाच्या हद्दीत १७५ अपघाती आणि अकस्मात मृत्यू झाले आहेत. धावत्या रेल्वेत अचानक प्रकृती खालावल्याने आणि वेळेतऔषधोपचार मिळू न शकल्याने काही जणांचे मृत्यू झाले आहेत. रेल्वे प्रवासात औषधोपचार पुरविणे रेल्वेची जबाबदारी आहे, परंतु ती मिळत नसल्याचे दिसून आले आहे.