पन्नास खोके…सब कुछ ओके… ही घोषणा सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार गाजत आहे. त्यावरच टिप्पणी करणारा बडग्या उद्या शनिवारी निघणाऱ्या मारबत-बडग्या मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे.

हेही वाचा – VIDEO : ‘आला बाबूराव आता आला बाबूराव’, भाजपा आमदार टेकचंद सावरकर यांचा भन्नाट डान्स

गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे निघू न शकलेली विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली ही मिरवणूक उद्या शनिवारी सकाळी १० वाजता मस्कासाथ येथून निघणार आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात ५० खोक्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरच भाष्य करणारा बडग्या छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीतर्फे काढण्यात येणार आहे. लालगंज खैरी पुरा येथील युवाशक्ती बडग्या उत्सव मंडळाकडून महागाई आणि जीएसटीचा विरोध करणारे बडगे काढण्यात येणार आहेत.

खैरीपुरा बडग्या मंडळाकडून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा तर मासूरकर चौकातील बडग्या उत्सव मंडळाच्यावतीने राज्यात चर्चेचा विषय असलेल्या फुटीर नेत्यांचा बडगा निघणार आहे. या शिवाय १४१ वर्षांची परंपरा असलेली काळी व १३७ वर्षांची परंपरा असलेली पिवळी मारबत मिरवणुकीत राहणार आहे. काळी व पिवळी मारबत मस्कासाथ परिसरात येऊन तेथे दोन्हीची गळाभेट झाल्यानंतर शहीद चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. त्यानंतर बडकस चौक, महाल, केळीबाग, गांधीगेट, गांजाखेत मार्गे नाईकतलाव येथे त्यांचे विसर्जन केले जाते.