नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १७ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करून काही अधिकाऱ्यांना सुखद तर काहींना दु:खद झटका पोलीस आयुक्तांनी दिला. चार अधिकाऱ्यांना ठाणेदारी देण्यात आली तर चौघांवर अन्य जबाबदारी सोपवण्यात आली. शहर पोलीस दलात अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वनाथ चव्हाण यांना वाठोडा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदावर नियुक्ती देण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून ते पोलीस आयुक्तांचे वाचक म्हणून काम करीत होते. सर्वात तरुण पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे यांना पहिल्यांदाच नेतृत्व करण्याची संधी आयुक्तांनी दिली. सगणे यांना शांतीनगर पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा >>> बुलढाणा: इंधनाचा राखीव साठा ठेवण्याचे आदेश; जिल्हा प्रशासन ‘अलर्ट मोड’ वर
हिंगणा ठाण्याचे गुन्हे निरीक्षक गोकुल महाजन यांना कळमना ठाण्यात प्रभारी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले. बजाजनगर ते गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रमुख असा प्रवास करणाऱ्या शुभांगी देशमुख यांना हुडकेश्वर ठाण्याची जबाबदारी देण्यात आली. प्रशांत माने यांनी पुन्हा बदली करण्यात आली असून त्यांना आता गुन्हे शाखेत नियुक्त करण्यात आले. सुनील चव्हाण यांना आयुक्तांचे वाचक म्हणून तर गणेश जामदार यांची मानव संसाधन शाखेत बदली करण्यात आली. येत्या आठवडाभरात आणखी ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होणार असून काहींना नव्याने ठाणेदारी मिळणार आहे तर अनुभवी अधिकारी पुन्हा ‘साईड ब्रँच’ला जाण्याची शक्यता आहे. यासह दीपक गोसावी (गुन्हे शाखा), विश्वास पुल्लरवार (वाहतूक शाखा), नंदा मनगटे (विशेष शाखा), कविता ईसारकर (आर्थिक गुन्हे शाखा), मुकुंदा साळूंके (विशेष शाखा), अमित डोळस (विशेष शाखा), रणजीत सिरसाठ (वाहतूक शाखा) आणि संग्राम शेवाळे (पाचपावली) येथे बदली करण्यात आली.