नागपूर : देशात करोना नियंत्रणात असला तरी जगातील काही देशात करोनाचे नवनवीन रूप आढळत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जगाला दक्षतेचा इशारा दिला आहे. त्यानंतरही भारतात करोनाच्या वर्धक मात्रेकडे नागरिकांनी पाठ दाखवलेली दिसत आहे. १८ ते ४४ वयोगटातील दुसरी मात्रा घेतलेल्यांपैकी केवळ १९.४६ टक्केच नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीवरून दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोविन संकेतस्थळानुसार भारतात २६ ऑक्टोबपर्यंत करोना प्रतिबंधात्मक लसींच्या सर्व वयोगटातील २१९ कोटी ५७ लाख ५४ हजार १९१ मात्रा नागरिकांनी घेतली. त्यापैकी १०२ कोटी ६८ लाख २४ हजार ७५५ जणांनी पहिली, ९४ कोटी ९९ लाख ६८ हजार २६९ जणांनी दुसरी, २१ कोटी ८९ लाख ६१ हजार १६७ जणांनी वर्धकमात्रा घेतली. तर २५ ऑक्टोबपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील दुसरी मात्रा घेतलेल्या ५१ कोटी ६२ लाख ९६ हजार ३८३ जणांपैकी (१९.४६ टक्के) १० कोटी ५ लाख १४ हजार ५३४ जणांनीच वर्धकमात्रा घेतली.

हेही वाचा >>> “…तेव्हा मोदींनीच सर्वात जास्त विरोध केला होता”, ‘त्या’ प्रकरणावरून शरद पवारांनी दिल्या कानपिचक्या

४५ ते ५९ वयोगटातील दुसरी मात्रा घेतलेल्या १९ कोटी ७० लाख ७१ हजार २५३ जणांपैकी (२५.७२ टक्के) ५ कोटी ६ लाख ९३ हजार ८७ जणांनीच वर्धकमात्रा घेतली. साठहून अधिक वयाच्या दुसरी मात्रा घेतलेल्या १२ कोटी ३२ लाख १६ हजार ८३७ नागरिकांपैकी (३९.२१ टक्के) ४ कोटी ८३ लाख २३ हजार ४३ नागरिकांनीच वर्धक मात्रा घेतली, तर आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी दुसरी मात्रा घेतलेल्या १ कोटी १ लाख २० हजार ५१९ जणांपैकी (६९.८५ टक्के) ७० लाख ६९ हजार ३५८ जणांनीच वर्धकमात्रा घेतली. तर पहिल्या फळीतील दुसरी मात्रा घेतलेल्या १ कोटी ७७ लाख २० हजार ३०३ कर्मचाऱ्यांपैकी (७७.५७ टक्के) १ कोटी ३७ लाख ४५ हजार ६२९ जणांनीच वर्धक मात्रा घेतली. त्यामुळे वर्धकमात्रेला सगळ्यात कमी प्रतिसाद तरुण गटात दिसत असल्याचे चित्र आहे.

गेल्या लाटेत करोनाच्या सौम्य लक्षणामुळे रुग्णालयात दाखल व्हायची गरजच पडली नसल्याने नागरिकांत आजाराची भीती कमी झाली. त्यामुळेच नि:शुल्क असतानाही नागरिक वर्धक मात्रा घेणे टाळत आहे. परंतु काही देशांत करोनाचे नवनवीन आढळणारे रूप बघता करोना प्रतिबंधात्मक लस घेऊन शरीरातील या आजाराविरोधात लढण्याचे प्रतिपिंड वाढवणे गरजेचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. अमर आमले, हृदयरोग तज्ज्ञ, अर्नेजा रुग्णालय, नागपूर.