अकोला : मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारा तरुण आईला मजुरी घेऊन येतो, असे सांगत घरून निघाला. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. तो तरूण घरी परतलाच नाही. आईला फोन करून त्याने आपल्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती दिली. आई घटनास्थळावर पोहोचली तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला. दुर्दैवाने घरी त्याचा मृतदेहच परतला. ही थरारक घटना खदान परिसरातील जेतवन नगरात रविवारी सायंकाळी घडली.

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेतवन नगरात पूर्ववैमनस्यातून एका २१ वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. दोन गटांत झालेल्या हाणामारीत करण दशरथ शितोडे याचा मृत्यू झाला. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जेतवन नगरात रविवारी सायंकाळी दोन गटांत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील युवकांनी धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढवला. करण दशरथ शितोडे याच्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. वैभव पुरुषोत्तम शितोडे (२०) आणि विशाल गणेश वरोटे (२८) हे दोघेही हाणामारीत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केंदारे यांनी आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात काही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

पूर्ववैमनस्य व किरकोळ कारणावरून हे हत्याकांड घडल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे. खदान परिसरातील दोन गटातील वादातून एका युवकाची हत्या करण्यात आल्याने परीसरात दहशतीचे वातावरण आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले. त्यावरून पोलीस तपास करीत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तोंडावर आले होते बहिणीचे लग्न

आठवडाभर मोलमजुरी केल्यावर रविवारी मजुरीचे पैसे घ्यायला करण गेला होता. तो परत आलाच नाही. तोंडावरच मोठ्या बहिणीचे लग्न आले होते. त्यातच हा अनर्थ घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.