नागपूर : संत्रानगरी म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही शहर आहे. मात्र तेच शहरात तळ ठोकून असताना अंमली पदार्थांची सर्सार वाहतूक होत असल्याने एकीकडे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह लागत आहे तर दुसरीकडे नशेच्या आहारी जाणाऱ्या तरुणांना कायद्याचा कसलाच धाक उरला नसल्याचेही सिद्ध होते आहे. दिवसेंदिवस नशेच्या विळख्यात गुरफटत चाललेल्या गृहमंत्र्यांच्या शहरात हे काय चालू आहे, अशी कुजबूज आता सुरू आहे.
ड्रग्ज तस्करांच्या विरोधात पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी दोनच दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करीत ऑपरेशन थंडर हाती घेतले. या अंतर्गत पोलिस दल रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचे समुपदेशनही करीत आहे. मात्र असे असतानाही मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची होणारी तस्करी देखील चर्चेचा विषय बनत चालली आहे.
शहर पोलिसांनी एकट्या इमामवाडातून २४० ग्राम मेफेड्रोन (एमडी) पावडर जप्त करीत चौघांना अटक केली. निलेश लक्ष्मण देशमुख,प्रणय उर्फ सुमित गोपाल गायधने , आशिष प्रकाश मडावी, शुभम उर्फ भुऱ्या राजेश तिडके अशी अटक चार तस्करांची नावे आहेत. त्यांच्या कारची झडती घेतली असता पोलिसांना २४० ग्राम एमडी पावडर सापडले. विशेष म्हणजे हे सगळे तरुण ३५ वयोगटातील आहेत. यावरून तरुणाई किती मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या विळख्यात गुरफटत चालल्याचे दिसते.
महिनाभरात पडकले ३३६ तस्कर
ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ या महिनाभराच्या कालावधीत ३३६ तस्करांच्या मुसक्या आवळल्या. यातून पोलिसांनी आतापर्यंत एक किलो मेफेड्रोन (एमडी) आणि तब्बल २ किलो अफिम जप्त केले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने महिनाभरात १ कोटी ४० लाख १७ हजारांचे अंमली पदार्थ पकडले आहे. या तस्करीत पहिल्यांदा गुन्हा केलेल्या अल्पवयीन आणि तरुणांची संख्या अधिक असल्याची चिंता खुद्द पोलिस आयुक्त सिंगल यांनी व्यक्त केली होती.
पकडलेल्यांपैकी ७० टक्के व्यसनाधीन
महिनाभराच्या कालावधीत पोलिसांनी अटक केलेल्या एकूण ३३६ तस्करांपैकी जवळजवळ ७० टक्के म्हणजे २२६ जण हे अंमली पदार्थाचे सेवन करणारे तरुण आहेत. यातही मोठ्या संख्यने अल्पवयीन मुले आहेत. ही आकडेवारी तरुणाई किती गंभीरपणे व्यसनाधिनतेच्या विळख्या गुरफटत आहे, हे सांगणारी आहे.