नागपूर : शेतकरी आत्महत्येसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची आता स्पर्धा परीक्षार्थींच्या आत्महत्यांचे राज्य, अशी ओळख निर्माण होऊ लागली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) परीक्षा द्यायची म्हणून गाव-खेडी सोडून परवडत नसतानाही शहरात येऊन लाखो विद्यार्थी अभ्यास करतात. अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या हजारो मुलांपैकीच एक असलेल्या स्वप्नील लोणकरने ‘एमपीएससी ही सगळी माया आहे,’ असे म्हणत २०२१ मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून एमपीएससीसह सर्वच परीक्षा पद्धती सुधारण्याचे अनेकदा आश्वासन देण्यात आले. मात्र, मागे पाठ, पुढे सपाट याप्रमाणे कारभार सुरू असल्याने स्पर्धा परीक्षार्थींच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची शेवटची संधी हुकल्यामुळे एका ३६ वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केली. रामदास श्रीरामे (रा. कमळेवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड) असे या मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षार्थींच्या वाढत्या आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

श्रीरामे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत गट ‘ब’ संवर्गात बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांनी नागपूर येथे चार महिन्यांचे प्रशिक्षणदेखील पूर्ण केले होते. त्यांना अमरावती येथे बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर रुजू होण्यासाठी आदेश मिळाले होते. परंतु, यूपीएससीची संधी हुकल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामे हे अमरावतीला प्रशिक्षणासाठी जातो, असे सांगून घरातून निघाले होते. ते लातूरमध्ये पोहोचले आणि एका लॉजवर त्यांनी खोली घेतली. पहिल्या दिवसाचे खोलीचे भाडे देखील दिले. मात्र, दुसऱ्या दिवसाचे पैसे बाकी असल्याने तेथील कामगाराने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. परंतु, आतून प्रतिसाद मिळाला नाही.

कामगाराने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांकडून खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी श्रीरामे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांनी खोलीची झडती घेतली असता त्यांना एक ‘सुसाईड नोट’ आढळून आली. यामध्ये श्रीरामे यांनी यूपीएससी परीक्षेची शेवटची संधी हुकल्याने आपण गळफास घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच, कुटुंबाने पैशांची समान वाटणी करावी, माझ्या आत्महत्येची माहिती प्रसार माध्यमांना देऊ नका. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण निराश होतील, असेही पत्रात नमूद आहे. या आत्महत्येने महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षार्थींच्या आत्महत्या वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.