लोकसत्ता टीम

बुलढाणा : नांदुरा अर्बन बँकेच्या एका कर्मचाऱ्याने इतर कर्मचाऱ्यांच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने पाच कोटी ४५ लाख रुपये अपहार केल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशीअंती अपहाराचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. सदर रक्कम ही विविध खात्यात ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आली.

नांदुरा अर्बन बँक व्यवस्थापक राजेंद्र कुमार पांडे यांनी नांदुरा पोलिसात रीतसर तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रतीक शर्मा हा बँकेचा संगणक लिपिक असून तो ऑनलाइन (डिजिटल) व्यवहार संभाळतो. त्याने पाच कोटी ४५ लाख रुपयांची रक्कम इतर खात्यात वळती केली आहे. कर्मचाऱ्याला नोटीस देऊन याबाबत जाब विचारण्यात आला. मात्र त्याने कोणतेही उत्तर दिले नसून बँकेत गैरहजर राहत आहे. शेवटी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

आणखी वाचा-अद्भूत! एक महिन्यापासून घरांवर दगडफेक, कोण करतंय?

याबाबत बँकेचे अध्यक्ष चंपालाल झवर, उपाध्यक्ष दत्ता सुपे व व्यवस्थापक राजेंद्र कुमार पांडे यांना विचारणा केली असता, सदर प्रकार कर्मचाऱ्यांनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांवर बँकेच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे तसेच ठेवीदारांचा पैसा सुरक्षित असून ठेवीदारांनी कोणतीही काळजी करू नये असे आवाहन केले आहे.