राजेश्वर ठाकरे

नागपूर : रेल्वेगाडय़ा नियोजित वेळेत चालाव्या यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाब असला तरी लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा कित्येक तास विलंबाने धावताना दिसतात. या विलंबाला अतिवृष्टी, धुके अशा नैसर्गिक कारणांचे प्रमाण केवळ ४० टक्के आहे. याउलट गाडीला विलंब होण्याच्या ६० टक्के प्रकरणांमध्ये तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेने मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर या विभागातून धावणाऱ्या रेल्वेगाडय़ांचा अभ्यास करून विलंबाची कारणे शोधली आहेत.

मध्य रेल्वेने १ एप्रिल २०२३ ते १२ जुलै २०२३ या कालावधीत एकूण ३७ हजार ४० मेल, एक्स्प्रेस गाडय़ा चालवल्या. तसेच या कालावधीत दररोज १ हजार ८१० उपनगरीय रेल्वेगाडय़ा धावल्या. या काळात मेल, एक्स्प्रेस गाडय़ांचा वक्तशीरपणा ८५ टक्के आणि उपनगरीय गाडय़ांचा वक्तशीरपणा ९५ टक्के होता.  विलंबाची कारणे शोधताना बाह्य घटक आणि तांत्रिक बिघाड अशी वर्गवारी करण्यात आली. इलेक्ट्रिक आणि डिझेल लोकोमध्ये बिघाड होणे, ईएमयू रॅक्सच्या युनिटमध्ये दोष असणे, रुळांमध्ये दोष असणे आणि सिग्नल यंत्रणा नीट काम न करणे आदी तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाडय़ांना सर्वाधिक उशीर झाला. १ एप्रिल ते १२ जुलै २०२२ च्या तुलनेत, चालू वर्षांच्या १ एप्रिल ते १२ जुलै २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडांमध्ये २७.५७ टक्क्यांनी घट झाली आहे. -शिवराज मानसपूरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.