नागपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वायत्त ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) च्या सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी प्रयत्नांमुळे सिद्ध होत आहे. २०२४ वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य परीक्षेत ‘महाज्योती’च्या एकूण ६४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ‘महाज्योती’तील विद्यार्थ्यांचे यश निकालातून दिसून येत आहे.

‘महाज्योती’ संस्थेने ओबीसी, व्हिजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक, मार्गदर्शन, आणि आर्थिक मदतच दिली नाही, तर त्यांचा आत्मविश्वास निर्माण केला. संस्थेच्या प्रयत्नांचे प्रत्यक्ष फळ आज प्रत्येक घराघरातून उमटणारा बदल आहे. एमपीएससीच्या ग्रुप-बी अराजपत्रित सेवा एकत्रित मुख्य परीक्षेत महाज्योतीच्या ५५ विद्यार्थ्यांनी कर सहायक निरीक्षक (एसटीआय) आणि नऊ विद्यार्थ्यांनी सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) पदांवर निवड मिळवली. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ओबीसी प्रवर्गातील ४१, व्हिजेएनटी प्रवर्गातील २२ आणि एसबीसी प्रवर्गातील एक विद्यार्थी आहेत. स्पर्धा परीक्षांचे दरवाजे केवळ मेहनती आणि शिक्षणाने उघडतात, पुढील आयुष्याची दिशा ठरवतात. ‘महाज्योती’च्या उपक्रमांचा लाभ केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून, त्याचा थेट परिणाम राज्यातील हजारो कुटुंबांवर आणि समाजावर प्रर्कशाने दिसून येत आहे.

‘महाज्योती’ संस्थेने मागास प्रवर्गातील युवकांना मुक्त प्रशिक्षण, सक्षमता मार्गदर्शन, शैक्षणिक साधनसामग्री व डिजिटल स्रोत उपलब्ध करून दिले. यामुळे संस्थेचा प्रवास केवळ एक प्रशिक्षण केंद्र म्हणून न राहता, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना वास्तव बनवणारे शक्तिशाली व्यासपीठ ठरला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पद्धतींचा वापर, स्पर्धा परीक्षांसाठी सर्वसमावेशक नियोजन आणि उत्तम व्यवस्थापन यांच्या बळावर ‘महाज्योती’ने मागास घटकांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य नव्याने घडवण्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यामुळे आजचा निकाल हा यशाची पहिली पायरी ओलांडून हे विद्यार्थी समाजातील परिवर्तनाचे वाहक बनत आहेत. यानंतर विद्यार्थ्यांना शासन सेवेत योग्य ती संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हे ‘महाज्योती करीत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आज एमपीएससीच्या कर सहायक निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) निकालातून ‘महाज्योती’चे ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी एकंदरीत मिळविलेले यश हे मिळालेल्या दर्जेदार प्रशिक्षणाचे फलीत असल्याचा विश्वास संस्थेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

‘महाज्योती’चा दुर्गम विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहचविण्याचा संकल्प : मा. मिलिंद नारिंगे

होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी ‘महाज्योती’ सतत कटिबद्ध राहिली आहे. राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी केवळ आर्थिक मर्यादा, दुर्गम भागातील वास्तव्य किंवा आवश्यक संसाधनांचा अभाव यामुळे आपल्या क्षमतांना न्याय देऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना स्पर्धेत मागे राहावे लागू नये, यासाठी ‘महाज्योती’ने प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विद्यावेतनाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी संधीची दारे खुली केली आहेत. एकंदरीत ‘महाज्योती’चा दुर्गम विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहचविण्याचा संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे म्हणाले.