नागपूर : मुंबईत ११ जुलै २००६ ला झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, मोहम्मद अली आलम शेर शेख यांना नागपूरच्या कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. अंडा सेलमध्ये त्यांना कुठलीही कामे दिली जात नव्हती. त्यामुळे सुटकेच्या वेळी त्यांना सोमवारी कुठलाही मेहनताना मिळाला नाही, की कोणी नातेवाईकही न्यायला आला नाही. त्यामुळे १९ वर्षांनंतर दोघेही अगोदर असलेले काही हजार रुपये घेऊनच एटीएसच्या सुरक्षेत बाहेर पडले. एटीएसच्या पथकाने त्यांना गुप्त ठिकाणी सोडल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.
नागपूर कारागृहात रवानगी केल्यानंतर आक्रमकपणा व मुजोरी आणि इतक कैद्यांना केलेल्या मारहाणीमुळे तिसरा कैदी नावेदचा मात्र नागपूर कारागृहात मुक्काम वाढला आहे. त्याच्याविरोधात तुरुंगात मारहाणीची दोन प्रकरणे दाखल आहेत. सत्र न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने त्याला सोमवारी सोडले नाही.
एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, मोहम्मद अली आलम शेर शेख व नावेद हुसैन राशिद हुसैन खान यांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. एहतेशामला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या तिघांनाही ३० सप्टेंबर २०१५ला नागपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. तेव्हापासून त्यांना अंडा सेलमध्येच ठेवण्यात आले होते. अंडा सेलमध्ये त्यांना कारागृहातील कुठलीही काम दिली जात नव्हती. त्यामुळे सुटकेच्या वेळी त्यांना कुठलाही मेहनताना मिळाला नाही.
निर्दोष मुक्तता होऊनही नावेद तुरुंगातच
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेशानंतर निर्दोष सुटका केलेला तिसरा आरोपी नावेद हुसैन राशिद हुसैन खान आणखी एका प्रकरणात आरोपी आहे. जळगाव येथील असलेल्या नावेदने नागपूर कारागृहात २०१९-२० मध्ये मारहाण केली होती. हे प्रकरण सध्या सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानंतरही त्याला सोमवारी तुरुंगातून सोडले नाही.
माध्यमांना गुंगारा
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर एहतेशाम सिद्दीकी, मोहम्मद शेख या दोघांना दुपारी ५ च्या सुमारास सोडले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे माध्यमांनी कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी केली. मात्र, त्यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत रात्री सव्वा आठला कारागृहाबाहेर काढण्यात आले. माध्यमांना गुंगारा देत त्यांना दहशतवाद विरोधी पथकाने दोघांनाही गुप्त ठिकाणी सोडून दिले.
एकाचा कोरोनाकाळात मृत्यू
या प्रकरणातील आणखी एक आरोपी कमाल अन्सारी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात होता. त्यालाही न्यायालायने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र करोनाच्या साथीदरम्यान त्यालाही विषाणूची लागण झाल्याने सह आजार असलेल्या कमाल अंसारीचा मृत्यू झाला
एहतेशामला धक्का
एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकीने आपल्याला बॉम्बस्फोटात नाहक गोवल्याचा दावा करीत दिल्ली उच्च न्यायालयाकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली होती. १ जानेवारी २००६ ते ३० जून २००६ दरम्यान मुंबई विमानतळावरून हाँगकाँग किंवा चीनला जाणाऱ्या परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय किंवा इमिग्रेशन कार्यालयात नोंदवलेल्या मोहम्मद आलम गुलाम साबीर कुरेशीच्या प्रस्थान आणि आगमनाबाबत सिद्दीकीने ही माहिती मागितली होती. मात्र त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने २०२४ मध्ये त्याची याचिका फेटाळून लावत ही माहिती सार्वजनिक करता येणार नाही, असे स्पष्ट केले होते.