रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे (४५) याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप ३५ वर्षीय पीडित महिलेने केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.

गजानन कांबळे आणि तक्रारदार महिला यांच्यात गेल्या चार वर्षांपासून ओळख आहे. आरोपीने पीडित महिलेला विविध ठिकाणी नेत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच मारहाणही केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलीस ठाण्यात गजानन कांबळे याच्यावर ३७६ (२) (एन), ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत.