नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी सहअस्तित्वाचा मार्ग कधीच स्वीकारला आहे. इतरही वन्यप्राण्यांनी जगण्यासाठी सहअस्तित्वाचा पाठ घालून दिला आहे. आता फक्त माणसांनी त्यांच्याकडून हे सहअस्तित्व शिकण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त करीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार, निर्माता आणि दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थू यांनी ‘वाइल्ड ताडोबा’ हा माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटाचा ‘टीझर’ आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी पर्यटकांसमोर येत आहे.

एस. नल्लामुथ्थू भारतातील वन्यजीव माहितीपट निर्माता आहेत. रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ‘मछली’ ऊर्फ ‘टी-१६’वर त्यांनी ‘द मोस्ट फेमस टायग्रेस मछली’ हा माहितीपट तयार केला होता. ४५ मिनिटांचा हा माहितीपट जगातील ४७ देशांमध्ये १८ वेगवेगळ्या भाषांमध्ये दाखवण्यात आला. त्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार देखील मिळाले. तेच एस. नल्लामुथ्थू २०१७ पासून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील प्रसिद्ध वाघीण ‘माया’ वर काम करत होते. ‘माया’चे अस्तित्व लोप पावले, पण तिच्यावर अभ्यास करताना त्यांनी वाघासह इथल्या इतरही वन्यप्राण्यांचे सहअस्तित्व हेरले. ते जगासमोर आणले पाहिजे ही बाब त्यांना सतत खुणावत होती.

तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील ही संकल्पना आवडली. त्यातून ‘वाइल्ड ताडोबा’ या माहितीपटाची तयारी सुरू झाली. ‘माया’ वाघिणीसाठी त्यांनी केलेले चित्रीकरण होतेच. या संपूर्ण माहितीपटासाठी त्यांनी दोन ते अडीच वर्षे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात घालवले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर ते गाभा क्षेत्र त्यांनी या माहितीपटात आणले.

वन्यप्राण्यांना कोणतीही इजा पाेहचू नये, त्यांच्या दैनंदिनीत अडथळे येऊ नये याकरिता आवाज न करणाऱ्या ‘ड्रोन’चा चित्रीकरणासाठी वापर करण्यात आला. बराचसा भाग पर्यटकांसमोर देखील चित्रित झाला आहे. महाराष्ट्र वनविभागाने पहिल्यांदा चांगला पुढाकार घेतला आहे. विशेषकरून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात फक्त वाघच नाही तर इतरही वन्यप्राणी आहेत, ही जाणीव या माहितीपटातून होणार आहे.

“वाइल्ड ताडोबा” तून संपूर्ण ताडोबा..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघ किंवा इतर वन्यप्राणी जगण्यासाठी सहअस्तित्व स्वीकारतात. ही गोष्ट माणसांनीही शिकण्यासारखी आहे. आतापर्यंत ताडोबातील वाघच पर्यटकांना माहिती होते, पण ‘वाइल्ड ताडोबा’च्या माध्यमातून संपूर्ण ताडोबाची ओळख पर्यटकांना करून द्यायची आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी आम्ही फक्त पाच मिनिटांचा ‘टीझर’ पर्यटकांसमोर आणतो आहोत. हा संपूर्ण माहितीपट येत्या वन्यजीव सप्ताहात प्रदर्शित करता यावा, यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे.- एस. नल्लामुथ्थू.