scorecardresearch

नागपूर : दोन गटात तुफान ‘राडा’, बहिणीची बदनामी केल्यावरून वाद

आरोपींनी चाकूने डोके, पाठ आणि पायावर वार करत दुसऱ्या गटातील चार जणांना गंभीर जखमी केल्याचे तक्रारीत म्हणले आहे.

crime news
बहिणीची बदनामी केल्याच्या वादातून नागपुरात दोन गटात मारामारी (प्रातिनिधिक छायाचित्र)

बहिणीची बदनामी केल्याच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. एका गटाने वरचढ ठरत दुसऱ्या गटातील चार जणांना चाकू आणि काठ्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना बेलतरोडी ठाण्यांतर्गत रविवारी रात्री घडली.

हेही वाचा- नागपूर : राज्यपालांविरुद्धची याचिका मागे, अधिसभेच्या बैठकीचा मार्ग मोकळा

पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. आलेख अरविंद चौधरी (२५) रा. जीजामातानगर खरबी, सौरभ ज्ञानेश्वर गुरव (२५) रा. चिटणीसपुरा महाल, निशांत प्रदीप तांबडे (३२) रा. नवाबपुरा महाल आणि चेतन अशोक निकोडे (२६) अशी जखमींची नावे आहेत. आरोपींमध्ये रितेश दुरुगकर रा. हरीहरनगर बेसा आणि त्याच्या ७-८ साथीदारांचा समावेश आहे.

हेही वाचा- नागपूर : मेयो, प्रादेशिक मनोरुग्णालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

आलेख आणि रितेश हे दूरचे नातेवाईक आहेत. रितेश गत काही दिवसांपासून आलेखच्या विवाहित बहिणीबाबत आक्षेपार्ह बदनामी करीत होता. याबाबत आलेखला माहिती मिळाली. रविवारी रात्री तो जाब विचारण्यासाठी रितेशच्या घरी गेला. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली आणि प्रकरण निपटले. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास रितेशने त्याच्या साथीदारांना गोळा केले. आलेखला फोन करून सिद्धेश साईकृपा कॉम्प्लेक्ससमोर भेटायला बोलावले.

हेही वाचा- नागपुरातील व्यापाऱ्यांची शेअर्स ट्रेडिंगमध्ये २० कोटींनी फसवणूक

रितेश आपल्याला काहीतरी हानी पोहोचवू शकतो अशी भीती असल्याने आलेखही चार जणांनासोबत घेऊन तेथे पोहोचला. चर्चेदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. रितेश आणि त्याचे साथीदार पूर्ण तयारीने आले होते. सर्वांनी मिळून आलेख व त्याच्या साथीदारांवर हल्ला केला. चाकू, आणि काठ्यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. आलेख हल्लेखोरांच्या घोळक्यात सापडला. आरोपींनी चाकूने त्याचे डोके, पाठ आणि पायावर मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याचे साथीदार कसेबसे जीव वाचवून पळाले. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा- नागपूर : राष्ट्रवादीची जनजागरण यात्रा, ‘हमे तो लूट लिया’ म्हणत माजी आमदाराची मोदींवर टीका

बेलतरोडी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. जखमींना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. आलेखला भरती करण्यात आले, तर इतरांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. पोलीस रितेश आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 09:48 IST