यवतमाळ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी रात्री यवतमाळ सशस्त्र हल्ल्याने हादरले. गांजाच्या नशेत तरुणांच्या एका टोळक्याने ‘मूड झाला म्हणून’ दोन ठिकाणी निष्पाप जीवांवर चाकूने वार केले. यात एका तरुणाचा मृत्य झाला तर, दोघेजण गंभीर जखमी झाले. अन्य घटनेत लोहार येथे गाडी मध्ये का लावली म्हणून तरुणावर हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले.

खुनाच्या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. यातील मुख्य आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक आहे. अद्याप तीन आरोपी फरार आहे. पोलिसांनी यश सुभेदार व त्याचा साथीदार विधिसंघर्षग्रस्त बालक यांना अटक केली. यशला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. यश सुभेदार (२१), श्रेयस राऊत (२१) आणि विधिसंघर्षग्रस्त बालक (सर्व रा. शिवनगर जुना, उमरसरा) या आरोपींनी उमरसरा परिसरात बाल गोकुलम स्कूलजवळ बसून असलेल्या अभिमन्यू विठ्ठलराव देऊळकर व त्याचा मित्र अंकित गणेश कुकडे यांना ‘चला येथून उठा, आत्ताच मर्डर करून आलो’, असे म्हणत थेट चाकूने वार केले. यात अंकितच्या गळ्यावर व पाठीवर चाकू लागला, तर अभिमन्यूसुध्दा जखमी झाला. अंकितला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेपूर्वी याच टोळक्याने आर्णी मार्गावर राणाप्रताप गेटसमोर चहा दुकान चालविणाऱ्या अजिंक्य नाचपेलवार (२४, रा. शांतीनगर, वडगाव) या तरुणावर रागाने का बघतो म्हणत त्याच्यावर चाकूने हल्ला करुन जखमी केले.

हेही वाचा… अमरावती जिल्ह्यात परेदशी पाहुण्यांची वर्दळ! लालसर छातीची फटाकडी, समुद्री बगळ्याची प्रथमच नोंद

या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात यश सुभेदार (२१), श्रेयश राऊत (२१), आरोपी प्रज्वल रोहनकर (१९) व एक विधिसंघर्षग्रस्त बालक यांच्या विरोधात खून व खुनाचा प्रयल केल्याचा गुन्हा दाखल झाला. घटनेतील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. तिसऱ्या घटनेत लोहारा येथील जवाहर शाळेमागे विशाल सुखदेवराव राऊत (२९, रा. देवीनगर, कमला पार्क) याच्यावर त्याच्याच घराशेजारी राहणाऱ्या अक्षय ठाकरे (३५) व इतर दोन अनोळखी युवकांनी चाकू व लोखंड रॉडने हल्ला करून जिवाने मारण्याचा प्रयत्न केला. विशाल हा इलेक्ट्रिशियन असून, कामानिमित्त तो मित्र मिलिंद मडावी याची दुचाकी घेऊन जात होता. त्याच वेळी अक्षय हा दोन मित्रांना घेऊन दुचाकीने समोर आला. मिलिंदची दुचाकी तुझ्याकडे कशी, म्हणत थेट चाकूने विशालवर हल्ला केला. या तीन घटनेत तिघे गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू झाला. यवतमाळ शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना या घटना घडल्याने शहारत गुंडाराज असल्याची चर्चा आहे.