चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणारे रिसॉर्ट पूल पार्टी आणि दारू पार्टीने चर्चेत आले आहेत. पद्मापूर येथील पोद्दार रिसॉर्टमध्ये सोमवारी सकाळी अशाच प्रकारे पूल पार्टीत तरूणांनी दारूच्या नशेत मद्यधुंद अवस्थेत रिसॉर्ट व्यवस्थापकावर चाकूने हल्ला केला. यात व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून दुर्गापूर पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोममध्ये शांतता आणि मनोरंजनासाठी बांधण्यात आलेले रिसॉर्ट आता हळूहळू वादग्रस्त ठरत आहेत. ताडोबा बफर झोनमध्ये रिसॉर्टची संख्या वाढली असून आता येथे डीजेचा गोंधळ, दारूच्या नशेत मद्यधुंद तरूणाईकडून पूल पार्टीचे नियमित आयोजत केले जात आहे. यामुळे वाघांसह वन्यप्राण्यांना देखील त्रास होत आहे. या प्रकारामुळे गुंडगिरी वाढत चालली आहे.
अशाच प्रकारची धक्कादायक घटना दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पद्मापूर गावाजवळील पोद्दार रिसॉर्टमध्ये सोमवारी सकाळी घडली. येथे पूल पार्टीसाठी आलेल्या तरुणांनी नशेत धुंद होऊन डीजे वाजवण्यावरून वाद करत रिसॉर्ट व्यवस्थापकावर चाकूने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घूस येथील पाच तरुण सोमवारी सकाळी सुमारास ११ वाजता पोद्दार रिसॉर्टमध्ये आले. दारूच्या नशेत झिंगणाऱ्या या तरूणांनी डीजे वाजवण्यावरून रिसॉर्ट व्यवस्थापकाशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दारूच्या नशेत या मद्यधुंद तरूणांनी थेट रिसॉर्ट व्यवस्थापकावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आणि तेथून फरार झाले.
जखमी व्यवस्थापकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत पाचही आरोपींना भद्रावती येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ललित गाताडे, आकाश आसुटकर, विष्णू बोंगाले, करण तीर्थगिरिवार आणि कृष्णा तोगार यांचा समावेश असून हे सर्व आरोपी घुग्घूस येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. ताडोबा बफर झोनमध्ये अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या रिसॉर्ट संचालकांवर तसेच दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, वन विभागाने रिसॉर्टची कडक तपासणी करावी, मद्य परवाना नसलेल्या रिसॉर्टवर कारवाई करावी अशीही मागणी समोर आली आहे.
 
  
  
  
  
  
 