अकोला : दक्षिण व उत्तर भारताला जोडणाऱ्या काचीगुडा ते भगत कि कोठी दरम्यान नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अनेक धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या या रेल्वेगाडीमुळे प्रवाशांसह भाविकांना मोठा दिलासा मिळेल. विशेष स्वरूपात धावणाऱ्या या गाडीला नियमित स्वरूपात सुरू करण्याची मागणी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी केली होती. त्याला रेल्वे मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली असून २० जुलैपासून ही गाडी नियमित स्वरूपात धावणार आहे.
गाडी क्रमांक १७६०५ काचीगुडा ते भगत कि कोठी एक्सप्रेस २० जुलैपासून दररोज काचीगुडा येथून २३.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी २०.०० वाजता भगत कि कोठी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक १७६०६ भगत कि कोठी ते काचीगुडा एक्सप्रेस २२ जुलैपासून दररोज २२.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १५.४० वाजता काचीगुडा येथे पोहोचेल. या गाडीला निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, नर्मदापूरम, राणी कमलापती, संत हिरदाराम नगर, सिहोर, मक्सी, उज्जैन, रतलाम, जावोरा, मंदसोर, निमच, चितोरगढ, भिलवारा, बिजाईनगर, नसिराबाद, अजमेर, ब्यावर, सोजत रोड, मारवार, पाली मारवार या रेल्वेस्थानकावर थांबा आहे.
दोन द्वितीय वातानुकूलित, सात तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन जनरेटर कम लगेज ब्रेक व्हॅन, अशी गाडीची संरचना राहणार आहे. जोधपुर, अजमेर, जयपुर, उज्जैन, ओंकारेश्वरला जाणाऱ्या तसेच दक्षिण भारतात हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांसह भाविकांसाठी ही गाडी उपयुक्त ठरेल.
नागपूर आणि नाशिक रोडदरम्यान एकेरी विशेष अनारक्षित गाडी धावणार
प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूर आणि नाशिक रोडदरम्यान दोन एकेरी विशेष अनारक्षित रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१२०६ एकेरी विशेष अनारक्षित गाडी २३ आणि २४ जुलै रोजी नागपूर येथून सायंकाळी १९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता नाशिक रोड स्थानकात पोहोचेल. या गाडीला नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड रेल्वेस्थानकावर थांबा राहणार आहे. या गाडीला एकूण १८ अनारक्षित डबे असतील. यामध्ये १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन एसएलआरडी कोच असतील.