नागपुर. शेतमालाला योग्य बाजार भाव द्या , सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी करत आंदोलन करणाऱ्या प्रहार संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाला गुरुवारी गोंडखैरी येथे हिंसक वळण लागले. अमरावती मार्गावरील एका आंदोलकाने शववाहिका पेटवून दिल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
चक्काजाम आंदोलन संपल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. बळीराजा फाउंडेशनची ही शववाहिका परिसरातील नागरिकांनी सोयीसाठी वापरली जात होती.
ही शववाहिका प्रहार संघटनेचे तालुका पदाधिकारी रजनीकांत अतकरी यांच्या घरासमोर उभी होती. आंदोलनानंतर ती दुपारी महामार्गावर आणून पेटवून देण्यात आल्याचे कळमेश्वरचे ठाणेदार मनोज काळबांडे यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना रोखल्याने संताप
आमदार बच्चू कडू यांचा मतदार संघ असलेला अमरावती जिल्हा हा प्रहार संघटनेचे मुख्यालय आहे. त्यामुळे राज्यभरात पुकारलेल्या या चक्काजामसाठी प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नागपूरच्या दिशेने निघाले होते. याची कुणकूण लागताच पोलिसांनी नागपूर अमरावती महामार्गावरील गोंडखैरी येथे कार्यकरर्त्यांची कोंडी करीत त्यांना शहरात प्रवेश करण्यावरून रोखून धरले. त्यावरू जाळपोळीचे पडसाद उमटल्याचे प्रहारच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.