अकोला : कृषिमंत्र्यांचे पालकत्व असलेल्या वाशीम जिल्ह्यात ‘आत्मा’च्या महिला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी करून चित्रीकरण करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या हातातून मोबाइल हिसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नंतर मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून सारवासारव करण्यात आली. गैरसमजातून तो प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये महिला अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना असभ्य वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाशीम येथील ‘आत्मा’ च्या वतीने शाश्वत शेती दिनानिमित्त शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

७ ऑगस्ट रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण भवन येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात खरीप हंगामातील पिकांचे तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, महाविस्तार ॲपचा वापर, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी, तसेच मूल्यवर्धन साखळी या विषयांवर शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी यात सहभागी झाले. कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. नियोजन कोलमडल्याने अनेक शेतकऱ्यांना जेवण मिळाले नाही. संतप्त शेतकऱ्यांनी आयोजकांना जाब विचारला. यावेळी ‘आत्मा’ विभागाच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे संतापल्या. त्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी करून हा सर्व प्रकार चित्रित केला जात असतांना शेतकऱ्याच्या हातातून मोबाइल देखील हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महिला अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काही गैरसमज निर्माण झाले

शाश्वत शेती दिनानिमित्त शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सुरुवातीस सकाळी ११.३० वाजेपर्यंत अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मिळून जवळपास ६० जण उपस्थित होते. मात्र कार्यक्रमादरम्यान अधिक शेतकरी सहभागी झाल्याने उपस्थिती वाढून १५० ते २०० झाली. या वाढीव उपस्थितीचा विचार करून तत्काळ अतिरिक्त जेवणाची व्यवस्था करण्यात आली, परंतु त्यासाठी काही वेळ लागल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला, असे आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी मान्य केले.

काही शेतकरी व कॅटरिंग प्रतिनिधींशी संवाद सुरू असताना चित्रिकरण झाले. या प्रसंगाबाबत काही गैरसमज निर्माण झाले असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी अरेरावी किंवा अवमानकारक वर्तन करण्यात आले नसल्याचे प्रकल्प संचालकांनी सांगितले. शेतकऱ्यांप्रति दृष्टिकोन नेहमीच आदर, जिव्हाळा आणि सहकार्याचा राहिला आहे आणि तो पुढेही कायम राहील, असे महाबळे यांनी नमूद केले.