अमरावती : जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सोयीच्या ठिकाणी बदली व पदस्थापना घेण्यासाठी शिक्षकांनी बनावट दुर्धर आजार आणि अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा आधार घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकांची तत्काळ विशेष समिती द्वारे चौकशी करून अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश विभागातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अनेक शिक्षकांनी अपंग असल्याचे ,दुर्धर आजार असल्याचे बनावट दस्तावेज तयार करून बदल्या करून घेतल्या आहेत. हा गंभीर प्रकार प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी समोर आणला आहे. या बदली प्रक्रीयेमध्ये विशेष संवर्ग भाग १ मध्ये अपंग, विविध गंभीर आजार व संवर्ग २ मध्ये पती पत्नी एकत्रीकरणाचा समावेश होतो. बदली प्रक्रियेत लाभ घेतलेल्या कित्येक शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र दाखवून बदलीचा लाभ घेतल्याच्या अनेक तक्रारी प्रहार संघटनेकडे आहेत. असा आरोप देखील यावेळी प्रहारच्या वतीने करण्यात आला होता. त्यामुळे अशा सर्वच शिक्षकांच्या कागदोपत्रांची चौकशी सह दुर्धर आजार, अपंगत्वाची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी यावेळी निवेदनाव्दारे महेश ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती.या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत या प्रकरणी विशेष समिती मार्फत चुकशी करण्याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी विभगातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशाने शैक्षणिक वर्तूळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>>वर्धा: दारूची लत सुटण्यासाठी घेतली जडीबुटी, थोड्याच वेळात…
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व जिल्हांतर्गत बदली मध्ये लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची, कागदोपत्री पुराव्यांची विशेष समिती द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या शिक्षकांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. याबाबतचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्णत्वास गेलेली असली तरी बदली झालेल्या शिक्षकांना या सत्र अखेर म्हणजेच मे २०२३ मध्ये कार्यमुक्त व रुजू केले जाणार आहे.
हेही वाचा >>>गडचिरोली: भामरागड प्रकल्पातील गैरव्यवहाराची ‘एसआयटी’ मार्फत चौकशीची मागणी
तत्पूर्वी या सर्व शिक्षकांच्या व आंतरजिल्हा बदलीने आलेल्या संवर्ग १ मधील शिक्षकांच्या कागदोपत्रांची व अपंगत्व, आजाराची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, दुर्धर आजार, पक्षाघाताचा आजार दाखवून अनेक शिक्षकांनी बदलीचा लाभ घेतला आहे. अशा शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करुन दोषींवर कार्यवाही झाल्यास खऱ्या दिव्यांग व प्रामाणिक शिक्षकास न्याय मिळेल. विभागीय आयुक्त कार्यालयाने आमच्या निवेदनाची दखल घेतली आहे. आता जिल्हा परिषद प्रशासनाकडून देखील निष्पक्ष तपासणी अपेक्षित असल्याचे महेश ठाकरे यांचे म्हणणे आहे.