scorecardresearch

नागपूर : एसटी’बसला आग लागू नये म्हणून विशेष मोहीम, बॅटरी, वायर, इंजिन तपासणार

देखभाल व दुरूस्ती अभावी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) काही बसला आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या.

st bus
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

महेश बोकडे

नागपूर : देखभाल व दुरूस्ती अभावी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) काही बसला आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी एसटीने राज्यातील सगळ्या विभाग नियंत्रक, कार्यशाखांना बसमधील बॅटरी, वायर, इंजिनसह इतर सर्व यंत्रणांची देखभाल- दुरूस्तीची विशेष मोहीम राबवून ५ फेब्रुवारीपूर्वी मुख्यालयाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

एसटी महामंडळाच्या बसला ८ डिसेंबर २०२२ ला नाशिकच्या शिंदे पळसे टोल नाका परिसरात आग लागली होती. त्यानंतर ३ जानेवारीला ठाणे येथे बसला आग लागली होती. इतरही काही भागात अशा घटना घडल्या. काही घटनांमध्ये वाहनांची देखभाल व दुरूस्ती न झाल्याने आग लागल्याचेही महामंडळाच्या निदर्शनात आले. त्यामुळे महामंडळाने राज्यातील सगळ्या विभाग नियंत्रक, यंत्र अभियंत्यांना बॅटरी बाॅक्स व चालक केबीनमध्ये बलाटा पॅकिंग सुस्थितीत असल्याची खात्री करण्यास सांगितले.

हेही वाचा >>> नागपुरात ठाकरे गटावर कार्यालय रिकामे करण्याची नामुष्की?; भाडे, वीज देयक भरायलाही पैसे नाहीत

सोबत बॅटरी मेन केबल सुस्थितीत असणे, रुटिंग व क्लॅम्पिंग करणे, केबल कुठल्याही मेटलच्या भागाला स्पर्श करू नये, बॅटरी केबलवर विशिष्ट नळीचे आवरण असावे, बसमधील सर्व प्रकारच्या वायर हार्नेस सुस्थितीत असावे, अग्नीशमन उपकरणे वैध मुदतीचे व सुस्थितीत असल्याचे तपासावे, गिअर लिव्हर लिंकेजेसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्ले नसल्याची खात्री करावी, अशा सूचना महामंडळाने दिल्या आहेत. याबाबतचा अहवाल महामंडळाला ५ फेब्रुवारीपूर्वी सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे. या वृत्ताला एसटी महामंडळाच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 11:01 IST