नागपूर : मुल-चंद्रपूर मार्गावरुन जात असाल, तर सावधान. गेल्या आठवड्याभरापासून या मार्गावर केसलाघाट परिसरात ‘के मार्क’ नावाच्या वाघिणीने नागरिकांना अक्षरश: जेरीस आणले आहे. दोन दिवसांपूर्वी या वाघिणीने एका दुचाकीस्वाराला जखमी केले. तर आता दुचाकीवरुन जाणारे एक दाम्पत्य थोडक्यात बचावले. हे दाम्पत्य दुचाकीवरुन जात असतानाच मागून वाघीण आली आणि रस्ता ओलांडत दुसरीकडे गेली. क्षणभरासाठी का होईना, जीव कंठाशी आला होता.
आईचे प्रेम, तिची माया आणि तिचे संरक्षण करण्याच्या वृत्तीची तुलना कशाशीही करता येत नाही. आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही धोक्याचा सामना करू शकते. मात्र, त्यानंतरही ती जेव्हा मुलांना गमावते, तेव्हा तीची अवस्था सैरभैर होते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘के मार्क’ वाघिणीने तिच्या बछड्याला अपघातात गमावल्यानंतर तिचीही अवस्था काहीशी अशीच झाली त्यामुळे समोर येईल त्या वाहनांवर ती हल्ला करत आहे.
चंद्रपूर महामार्गावरील केसलाघाट परिसरात ‘के मार्क’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघिणीला तीन बछडे आहेत. या रस्त्याच्या उजव्या बाजूला प्रादेशिकचे वनक्षेत्र तर डाव्या बाजूला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे बफर क्षेत्र आहे. दक्षिण ताडोबाचा केसलाघाट आणि झरीपेठचे जंगल तिचा अधिवास आहे. अतिशय जोखमीच्या तिच्या अधिवासातून राष्ट्रीय महामार्ग जातो. अनेकदा या मार्गावर ती कायमच बछड्यांसोबत फिरताना दिसून येते. त्यामुळे पर्यटकच नाही तर या मार्गावरुन जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना ती दिसते. मात्र, तिने कधीही कोणत्या वाहनांवर हल्ला केला नाही. मात्र, गेल्या चार दिवसांपासून ती केसलाघाटच्या रस्त्यांवरुन जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करत आहे.
नागपूर : मुल-चंद्रपूर मार्गावरुन जात असाल, तर सावधान. गेल्या आठवड्याभरापासून या मार्गावर केसलाघाट परिसरात ‘के मार्क’ नावाच्या वाघिणीने नागरिकांना अक्षरश: जेरीस आणले आहे. https://t.co/2jrmCKw8Ui#nagpur #Tiger #Attack pic.twitter.com/BClz8hbBSG
— LoksattaLive (@LoksattaLive) October 27, 2025
दोन ते तीन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास या वाघिणीने एका दुचाकीवर झडप घातली. यात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमीला मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, या घटनेने नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
बछड्याचा विरह सहन होईना…
मूल-चंद्रपूर महामार्गावरील केसलाघाट रस्त्यावर शुक्रवारी वाहनाच्या धडकेत वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला. ‘के मार्क’ या वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी एक आता तिच्यासोबत दिसून येत नाही. त्यामुळे अपघातात मृत पावलेला तो हाच बछडा असावा. बछड्याला गमावल्यामुळे त्याच्या शोधात ही वाघीण सैरभर होऊन वाहनांवर हल्ला करत असावी, असाही अंदाज आता व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रस्ते अपघातात मृत पावलेल्या बछड्याचे अवशेषाचा नमुना तपासणीसाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्रात पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल, असे वनखात्यातील संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
