नागपूर : भारतीय वन्यजीव कायद्याने त्याला संरक्षण दिले आहे. याच कायद्याअंतर्गत “शेड्युल वन” चा वन्यप्राणी म्हणून त्याला विशेष संरक्षण आहे. त्यामुळे तो त्याच्या घरात असो व बाहेर, त्याचा दरारा मात्र कायम असतो. कुणी त्याच्या वाटेत आडवे आले तर त्याला तो आडवा करू शकतो आणि तो इतरांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट देखील अडवू शकतो. वाघाचा दराराच तसा आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहर्ली-पदमापूर रस्त्यावर वाघाने रस्त्यावर येत संपूर्ण वाहतुकच अडवून धरली. वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी हा व्हिडिओ चित्रित केला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघ हमखास दिसणारच आणि म्हणूनच भारताच्या कानाकोपऱ्यातून नाही तर भारताबाहेरून देखील लोक या व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रदर्शनासाठी येतात. या व्याघ्रप्रकल्पाने पर्यटकांना कधी निराश केले नाही. सुरुवातीला ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातच दिसणारे वाघ बफर क्षेत्रात अधिक दिसायला लागले आणि म्हणूनच पर्यटकांचा ओढा कोअर पेक्षा बफर क्षेत्राकडे अधिक आहे. मात्र, आता वाघांची संख्या वाढल्याने त्यांना बफरक्षेत्र देखील कमी पडू लागले आहेत.
त्यामुळे जळीस्थळी वाघच वाघ दिसायला लागले आहेत. मोहर्ली-पदमापूर हा रस्ता त्यातलाच एक. काही दिवसांनी हा रस्ता वाघांचा रस्ता म्हणून ओळखला जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावर अलीकडच्या काही वर्षांत सातत्याने व्याघ्रदर्शन होत आहे. मात्र, वनखात्यासाठी ती आता डोकेदुखी ठरली आहे.
या मार्गावर सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनमूळे या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. चारचाकी वाहनधारकांसह दुचाकी वाहनधारकांची संख्या या मार्गावर वाढत चालली आहे. त्यामुळे वाघ दिसला रे दिसला की गर्दी झालीच म्हणून समजा. लगतच्या गावांमध्ये जाण्याचा हा मार्ग असल्याने त्याचाच फायदा घेताना लोक दिसून येत आहेत. ताडोबाची सफारी सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे फुकटात होणाऱ्या व्याघ्रदर्शनासाठी लोक या रस्त्यावर गर्दी करत आहेत. वाहनांच्या खाली उतरून वाघाचे छायाचित्रे घेण्याची ओढ त्यांच्यात लागली असते. अशावेळी वाघाने हल्ला केला तर काय? याची जाणीव त्यांना नसते.
अलीकडेच मोहर्ली-पदमापूर या रस्त्यावर वाघाने ठाण मांडून रस्त्यावरची वाहतूक अडवून धरली. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या बससह इतरही वाहनांना बराचवेळ त्याठिकाणी थांबून राहावे लागले. मात्र,त्यातही काही महाभाग रस्त्यावर उतरून त्या वाघाचे छायाचित्रे काढताना दिसून आले. वाघ शांतपणे बसून राहिला म्हणून ठीक, नाही तर अघटित घडायला काहीच वेळ लागला नसता. वनखात्यासाठी ही डोकेदुखी वाढतच चालली असून यावर नियंत्रण कसे मिळवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोरही आहे.