दक्षिण गडचिरोलीतील खराब रस्त्यामुळे एका आठ महिन्यांच्या आदिवासी गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. प्रसूतीकळा सुरू झाल्याने तिला अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जात होते. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला.झुरी दिलीप तलांडी (२६, रा. चिकटवेली) असे मृत महिलेचे नाव असून खराब रस्ते आणि संपर्काचे साधन नसल्याने हे प्रकरण एक आठवड्यानंतर पुढे आले.

हेही वाचा >>> नागपूर : पोहण्याची पैज जीवावर बेतली, वेणा नदीत दोन मित्र गेले पुरात वाहून

तालुका मुख्यालयापासून ७० किमी लांब असलेल्या चिकटवेली या गावात तीन लहान- मोठे नाले पार करून जावे लागते. अनेक वर्षांपासूनची रस्ता बनविण्याची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. अशातच ६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास झूरी तलांडी या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिला ३५ किमी जवळील कमलापूर आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी पती आणि नातेवाईक ट्रॅक्टरने निघाले. मात्र, खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर खड्ड्यात रुतले त्यामुळे उशीर झाल्याने झुरीने वाटेतच प्राण सोडले. कुटुंबीयांनी अर्ध्यातूनच तिला घरी परत नेऊन दुसऱ्या दिवशी अंत्यविधी पार पाडला. विशेष म्हणजे, आठवडाभर याबाबत कुणालाच माहिती नव्हती. जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र कमलापूरच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कळले तेव्हा त्यांनी कसेबसे चिकटवेली गाव गाठून माहिती घेतल्याने हे प्रकरण बाहेर आले. खराब रस्त्यामुळे एका आदिवासी गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>> विदर्भ विकास मंडळ पुनर्जीवित करण्याकडे दुर्लक्ष ? ; विरोधात असताना आक्रमक भाजप सत्तेत आल्यावर गप्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेळेत पोहोचल्यास जीव वाचला असता
मृत गर्भवती महिलेला त्यादिवशी सकाळपासूनच त्रास सुरू झाला होता. मात्र, त्यांनी गावातील पुजाऱ्याकडे उपचार केला. रात्रीच्या सुमारास प्रकृती जास्त बिघडल्याने तिला आरोग्य केंद्रात आणण्यात येत होते. मात्र, तिचा वाटेतच मृत्यू झाला. जर ती तीन तासाआधी पोहोचली असती तर प्राण वाचले असते.- डॉ. राजेश मानकर ,वैद्यकीय अधिकारी, कमलापूर.