चंद्रपूर : दोन वाघाच्या झुंजीत अडीच वर्षीय वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील किन्ही नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५१० मध्ये घडली. मागील दहा महिन्यांत बल्लारपूर वनपरिक्षेत्रात सहा वाघांचा मृत्यू झाल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे.

बल्लारपूर वनविभागाचे वनकर्मचारी व वनरक्षक गस्तीवर असतांना त्यांना कक्ष क्रमांक ५१० मध्ये वाघ मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी दाखल होवून वाघाच्या म़ृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शविवच्छेदनासाठी ताडोबाच्या वन्यजीव उपचार केंद्रात आणण्यात आले. वाघाचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार यांनी केले. वाघाच्या शरीरावर जखमा असल्याने दोन वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मृत्यूचे नेमके कारण कळावे यासाठी ‘विसेरा’ प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

हेही वाचा…‘या’ चौदा गावातील नागरिकांनी केले दुसऱ्यांदा मतदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच महिन्यात चार जणांनी गमवला जीव

बल्लारशाह वनपरिक्षेत्रात मागील दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहा वाघांचा मृत्यू झाला आहे. तसेच या वनपरिेक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्षसुध्दा शिगेला पोहोचला आहे. पाच महिन्यांच्या कालावधीत चार जणांचा वाघाच्या हल्ल्यात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. ७ जानेवारीला कारवा जंगलात वाघाने एकाला ठार केले. यानंतर २७ फेब्रुवारीला एका व्यक्तीचा यात मृत्यू झाला. १४ मार्चला आणि १४ एप्रिलला या वाघाने आणखी दोघांना ठार केले होते.